सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी स्वबळावर तसेच मैत्रीपूर्ण लढतीची तयारी केली आहे. महायुतीतर्फे बंडखोरी टाळण्यासाठी आणि विरोधकांना धक्का देण्यासाठी ही रणनीती आखली जात असून, दोन्ही पक्षांनी जोरदार पक्षप्रवेशाची आघाडी घेतली आहे.
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात स्थानिक पातळीवर समन्वय साधून बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. खासदार नारायण राणे महायुतीचे खासदार असल्याने त्यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण त्यांच्या भूमिकेकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आमदार दीपक केसरकर (शिवसेना-शिंदे गट) यांनी ‘महायुती’ एकत्र लढल्यास विरोधकांना धक्का देता येईल, असे मत व्यक्त केले आहे. आमदार निलेश राणे (शिवसेना-शिंदे गट) यांनी मात्र स्वबळावराचा सूर लावला आहे. त्यातच पालकमंत्री नितेश राणे यांनीही मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका मांडली. त्यांच्या मते, महायुती एकत्र लढल्यास महाविकास आघाडीला तयार उमेदवार मिळतील, हे टाळण्यासाठी ‘मैत्रीपूर्ण लढत’ योग्य ठरेल.
जिल्ह्यात एकूण ५० जिल्हा परिषद गट, १०० पंचायत समिती गण आणि सावंतवाडी, वेंगुर्ले व मालवण या तीन नगरपरिषदांसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. भाजप-शिंदे गट जिल्ह्यात हे दोन्ही पक्ष सत्ताधारी आणि प्राबल्य असलेले आहेत. ‘एक पद, एक व्यक्ती’ असा निकष भाजपने लावल्याची चर्चा असून, यामुळे उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांनी शिवसेना ( ठाकरे) पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावर अधिक भर दिला आहे.
जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचे तसे प्राबल्य नाही, मात्र शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अजूनही कार्यरत आहे.
सध्या तरी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी (शिवसेना-उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार) होण्यासाठी ठोस प्रयत्न झालेले नाहीत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाआघाडीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मनसे, वंचित आघाडीसह अन्य पक्षातील इच्छुकांनीही निवडणुकीसाठी तयारी दर्शवली आहे.
