विधान भवनाच्या प्रवेशद्वारापाशी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर विधिमंडळाचे पावित्र्य, आमदार माजल्याची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भावना, निर्बंध लादण्याचे पिठासीन अधिकाऱ्यांचे निर्देशानंतर परिस्थिती बदलणार का, याचीच उत्सुकता आहे.
विधिमंडळात हाणामारीचा हा अलीकडच्या काळातील दुसरा प्रकार. सभागृहातही अनेकदा प्रकरण हातघाईवर गेले आहे. विधिमंडळ हा फक्त राजकीय आखाडा न राहता मारामारीचा आखाडा होत असल्याचे चित्र हळूहळू निर्माण होऊ लागले आहे.
विधिमंडळाते जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत ही खरी अपेक्षा असते. कायदे मंडळात कायदे करताना त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक असते. दुर्दैवाने कायदे मंडळात कायद्यांवर फारशी चर्चा होत नाही. राजकीय उणेदुणे काढले जातात. यामुळेच ‘आमदार माजलेत’ ही लोकभावना तयार झाल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधान त्याअर्थी बोलके ठरते.
विधिमंडळाच्या सभागृहात राजकीय उणीदुणी काढली जातात. पण सभागृहातही हाणामारी, मारामारीचे प्रकार घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. २०१३ मध्ये याच विधानभवनात आमदारांनी सचिन सूर्यवंशी या पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण केली होती. वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी तत्कालीन आमदार क्षितीज ठाकूर यांची गाडी अडविली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी सूर्यवंशी यांना विधान भवनात पाचारण करण्यात आले. ते अधिकारी गॅलरीत बसल्याचे बघितल्यावर आमदारांचे पित्त खवळले व मग त्यांना आमदारांनी बेदम मारहाण केली होती.
सभागृहातील मारामारी किंवा वादाचे प्रसंग
- जांबूतराव धोटे यांनी अध्यक्षांच्या दिशेने पेपरवेट भिरकवाला होता. त्याबद्दल त्यांना सदस्य म्हणून बडतर्फ करण्यात आले होते. पण धोटे पोटनिवडणुकीत पुन्हा निवडून आले होते.
- समाजवादी पार्टीचे अबू आसिम आझमी यांनी २००९ मध्ये हिंदीत शपथ घेण्यास प्रारंभ करताच मनसेच्या आमदारांनी त्यांना सभागहात मारहाण केली होती. तसेच माईक तोडला होता. याबद्दल मनसेच्या चार आमदारांना चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेनंतर शिवसेना आमदारांनी सभागृहात मोडतोड केली होती.
- तत्कालीन मंत्री डॉ. पद्ममसिंह पाटील आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात सभागृहात शाब्दिक चकमक झाली होती.
- बबनराव ढाकणे आणि अण्णा डांगे या दोन आमदारांमध्ये सभागृहात चांगलीच जुंपली होती.
- एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांनी विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांना दालनात शिवीगाळ केली होती. त्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले होते.
- नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना काँग्रेस आमदार त्यांच्या अंगावर धावून गेले होते