संजय राउतांनी रोज उठून आरोप करण्यापूर्वी पक्ष नेतृत्वाशी बोलत जावे. मी आघाडीलाच मतदान केलेले असतनाही ते उगाच आरोप करत सुटले आहेत. खऱ्या चुका कुणाच्या आहेत, त्या सोडून त्यांनी अन्यत्र हवेत वार करू नयेत. तसेच असे आरोप करण्यापूर्वी एकदा उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत जावे, असा खोचक टीका आमदार संजय शिंदे यांनी संजय राउतांवर केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत शेवटच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहा-सात आमदारांची मते फुटली. यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे यांचाही समावेश असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट त्यांचा नामोल्लेख केला. यावर संतप्त होत शिंदे यांनी थेट राउतांवरच हल्लाबोल केला.ते म्हणाले, की आपण निवडणुकीतील घोडेबाजारात विकले जाणाऱ्यांपैकी नाही. घोडेबाजारात हरभरे खाल्ले नाही. आपण स्वाभिमान जपणारा नेता आहोत. राज्यसभा निवडणुकीत आपण शिवसेना नेते अनिल देसाई आणि आरविंद सावंत यांच्या सोबत जाऊन मतदान केले. आपल्या नेत्यांना विचारूनच मतदान केले, असे स्पष्टीकरण आमदार शिंदे यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपणास बोलावून घेऊन मंत्रिपद देऊ केले होते. परंतु आपण नम्रपणे नाकारले होते. आपल्यावर संजय राऊत यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. हे असे उठून कुणावरही आरोप करणे त्यांनी बंद करावे. हे आरोप करण्यापूर्वी एकदा उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत जा, असा खोचक सल्लाही शिंदे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.