विरोधकांच्या इंडिया आघाडीत सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. लवकरच जागावाटपाचे सूत्र निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या आघाडीच्या संयोजकपदासाठी योग्य नेत्याचा शोध घेतला जात असून आज (१३ जानेवारी) आघाडीतील घटकपक्षांच्या प्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत संयोजकपदासाठी कोणाची निवड करायची, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जी अनुपस्थित

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीच संयोजकपदी निवड व्हावी यासाठी संयुक्त जनता दल (जदयू) पक्षाकडून इंडिया आघाडीवर दबाव टाकला जात आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून नाराजी निर्माण झाली आहे. नुकतेच तृणमूलने आम्ही काँग्रेसशी जागावाटपावर चर्चा करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता तृणमूलच्या सर्वेसर्वा तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे तृणमूल पक्षाकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तृणमूलचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला

या आठवड्यात तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावर भाष्य केले होते. आम्ही काँग्रेसला दोन किंवा जास्तीत जास्त तीन जागा देऊ, अशी भूमिका तृणमूलने घेतलेली आहे. तृणमूलच्या हा प्रस्ताव काँग्रेसने याआधीच फेटाळलेला आहे.

ममता बॅनर्जी बैठकीला अनुपस्थित

आज होणाऱ्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत. याबाबत तृणमूलच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “या बैठकीबाबत आम्हाला संध्याकाळी पाच वाजता सांगण्यात आले आहे. ही बैठक शनिवारी सकाळी ११.३० वाजता होणार असून त्यात पक्षांचे प्रमुख असणार आहेत. ममता बॅनर्जी यांचे काही नियोजित कार्यक्रम आहेत. हीच बैठक पुढच्या आठवड्यात घेतल्यास ममता बॅनर्जी उपस्थित राहू शकतील, असे आम्ही काँग्रेसला कळवले आहे. एवढ्या कमी वेळात सांगितल्यामुळे ममता बॅनर्जी उपस्थित राहू शकणार नाहीत,” असे या नेत्याने सांगितले. तसेच या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होणार, याबाबतही काँग्रेसने सांगितलेले नाही, अशी माहिती या नेत्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संयोजकपदासाठी जदयूकडून प्रयत्न

जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांची संयोजकपदी वर्णी लागावी यासाठी या पक्षाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. आघाडीच्या इतर घटकपक्षांशी जदयूने संपर्क साधलेला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी तर नितीश कुमार यांची संयोजकपदी नियुक्ती केली जावी, असे जदयूला वाटते. असे झाल्यास देशातील जनतेपर्यंत एक सकारात्मक संदेश जाईल, अशी जदयूची भूमिका आहे.