Kamal Nath on Emergency in India 1975 : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे आणीबाणीच्या काळातील घटनांचे मोजक्याच साक्षीदार असलेल्या सक्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत. दिवंगत नेते संजय गांधी यांचे एकेकाळचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलनाथ यांनी १९८० मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला. एका विमान अपघातात संजय गांधी यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसमधील प्रभावी नेत्यांच्या यादीत कमलनाथ यांना स्थान मिळालं. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं आणीबाणीवर भाष्य केलं आणि त्या काळातील आठवणी सांगितल्या. नेमके काय म्हणाले कमलनाथ? ते जाणून घेऊ…
प्रश्न : ५० वर्षांनंतर आपण आणीबाणीच्या त्या २१ महिन्यांकडे कसे पाहता?
कमलनाथ म्हणाले, “आणीबाणीच्या काळात देशात प्रचंड शिस्त होती. अनेकांना अटक करून नजरकैदेत ठेवणे हा भाग वाईटच होता; पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की, त्या वेळीही सर्व रेल्वेगाड्या वेळेत धावत होत्या आणि सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. लोक शिस्त पाळून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देत नव्हते. मला अजूनही आठवतंय की, आणीबाणी घोषित करण्याआधी देशात कायदा व सुव्यवस्थेचे मोठे प्रश्न निर्माण झाले होते. सिद्धार्थ शंकर रे (पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि इंदिराजींचे सल्लागार), काँग्रेस अध्यक्ष डी. के. बरुआ या सगळ्याच नेत्यांनी इंदिराजींना सांगितले होते की, आणीबाणी लागू करायलाच हवी. संजय गांधींनीही म्हटलं होतं की, आता दुसरा पर्याय उरलेला नाही.”
प्रश्न : आणीबाणीच्या जाहीर घोषणेपूर्वी तुम्हाला याबद्दल काही कल्पना होती का? कारण ही माहिती फक्त अतिशय छोट्या गटापुरती मर्यादित होती…
कमलनाथ म्हणाले, “आणीबाणीचा निर्णय जेव्हा घेण्यात आला, तेव्हा मी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानीच होतो. आणीबाणी जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी २४ जून हा दिवस अतिशय महत्वाचा ठरला. तेव्हा काँग्रेसच्या सर्वांनाच काहीतरी मोठं घडणार याची चाहूल लागली होती; पण नेमकं काय होणार, ते आम्हाला कळत नव्हतं. माझ्या आठवणीप्रमाणे, २४ तारखेला पंतप्रधानांच्या निवासस्थानी सिद्धार्थ रे, डी. के. बरुआ व रजनी पटेल उपस्थित होते.”
आणखी वाचा : गुजरामधील विजयानंतर ‘आप’ने ७२ तासांतच केली आमदाराची हकालपट्टी; कारण काय?
कमलनाथ यांची राजकीय कारकीर्द
- कमलनाथ हे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असून, ते आणीबाणीच्या काळापासून पक्षासाठी सक्रियतेने काम करीत आहेत.
- काँग्रेसचे नेते म्हणून कमलनाथ यांनी केंद्र आणि राज्य स्तरावर दोन्ही ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत.
- १९७० च्या दशकात कमलनाथ यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
- संजय गांधी यांचे अत्यंत जवळचे मित्र असल्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये लवकरच महत्त्वाचे स्थान मिळाले.
- १९८० मध्ये कमलनाथ यांनी पहिल्यांदा मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली.
- काँग्रेसकडून नऊ वेळा ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि हे एक मोठं यश मानलं जातं.
- कमलनाथ यांनी विविध पंतप्रधानांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची मंत्रालयं सांभाळली.
- विश्व व्यापार संघटनेत (WTO) त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि वाणिज्य क्षेत्रात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले.
- डिसेंबर २०१८ मध्ये काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभेत विजय मिळवल्यानंतर कमलनाथ मुख्यमंत्री झाले.
- मार्च २०२० मध्ये ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या बंडामुळे काँग्रेसचं बहुमत कमी झालं आणि कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
प्रश्न : देशात आणीबाणी पुन्हा लागू होऊ शकते का?
या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. “देशात सध्या आणीबाणीसारखीच परिस्थिती आहे. आपण पाहत आहोत की, माध्यमांचा कसा गळा घोटला जात आहे. वृत्तवाहिन्यांवर कशा प्रकारे दडपण आणलं जातंय. इंदिरा गांधी यांच्या काळात रेडिओ चॅनल्स व वर्तमानपत्रं होती; पण वृत्तवाहिन्यांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात होती. आज काही ज्येष्ठ पत्रकार देशातील परिस्थितीबाबत स्वतःचं मत मांडत आहेत; पण त्यांच्यावर दडपण आणलं जातंय. इतर लोकशाही संस्थांबाबत काय सुरू आहे, हे तर मी सांगायलाच नको; सर्व काही अगदी स्पष्ट आहे.”

प्रश्न : आणीबाणीच्या काळात माध्यमांची भूमिका तुम्हाला कशी वाटली? त्यावेळी तुम्ही ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या संचालक मंडळावर सरकारच्या वतीने नियुक्त झाला होता…
“दी इंडियन एक्स्प्रेसचे संस्थापक रामनाथ गोयंका यांच्याविषयी माझ्या मनात खूप आदराचं स्थान होतं. त्यांचे पुत्र बी. डी. गोयंका हे माझे मित्र होते. १९७६ मध्ये रामनाथजींना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना कोलकात्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांच्या हातावर हात ठेवून मी म्हणालो, तुमच्याशिवाय आम्ही संचालक मंडळाची कोणतीही बैठक घेणार नाही. तुम्ही पूर्ण बरे झाल्यावरच सगळ्या निर्णयांमध्ये तुमची भागीदारी ठेवायची आहे”, असं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, “त्या काळात ‘दी इंडियन एक्स्प्रेस’चे वरिष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. मी संजय गांधींना स्पष्टपणे सांगितलं की, त्यांची सुटका झालीच पाहिजे.”
हेही वाचा : माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात वादाची ठिगणी; बहीण-भावंडातील लढाई नेमकी कशासाठी?
संजय गांधी निवडणुकांच्या विरोधात; पण इंदिरा गांधींचा निर्धार : कमलनाथ
‘दी इंडियन एक्स्प्रेस’मध्ये कार्यरत असलेल्या कूमी कपूर यांनी त्यांच्या आणीबाणीवरील पुस्तकात असा उल्लेख केलाय की, पत्रकार कुलदीप नायर यांना तुम्हीच (कमलनाथ) इंदिरा गांधी १९७७ मध्ये निवडणुका जाहीर करणार असल्याची पुष्टी केली होती, असा प्रश्न कमलनाथ यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “हो, अगदी बरोबर… निवडणुका घेण्याचं नेहमीच इंदिरा गांधींच्या मनात होतं. त्या म्हणाल्या होत्या की, आता सर्व पुरे झालं. त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून स्पष्ट होतं की, त्या निवडणुका घेऊ इच्छित होत्या”, असं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं.
आणीबाणीवरून संजय गांधी व इंदिरा गांधींमध्ये झाला होता वाद?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणाले, “मला आठवतंय की, डिसेंबर १९७६ मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला संजय गांधी आणि मी श्रीनगरला गेलो होतो. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते म्हणून संजय गांधी यांनी इंदिरा गांधींना फोन लावण्यासाठी कॉल बुक केला. त्यावेळी इंदिराजींनी त्यांना फोनवर सांगितलं की, तुम्ही ताबडतोब दिल्लीत परत या… त्यानुसार, संजय गांधी व मी दिल्लीला परतलो आणि मग इंदिरा गांधींनी त्यांना सांगितलं की, मी आणीबाणी उठवणार आहे. त्यांच्या या निर्णयाला संजय यांनी विरोध केला. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या की, मी निवडणुका जाहीर करणार आहे. त्यावर संजय म्हणाले, नाही… आधी आणीबाणी उठवा आणि मग निवडणुका घ्या… इंदिराजींनी त्यांचं ऐकलं नाही आणि आणीबाणी न उठवताच निवडणुका घ्यायचं ठरवलं. त्यावेळी दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर इंदिरा गांधींनी सर्वप्रथम मंत्रिमंडळाची बैठक बोलावून आणीबाणी उठवली.”