बॉलीवूड ‘क्वीन’ कंगना रणौत अभिनयात जितकी सरस कामगिरी करताना दिसते, तितकीच सरस कामगिरी ती राजकीय आखाड्यात करू शकेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कंगना रणौत हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना माध्यमांपासून अंतर राखून आहे. तिच्याविरोधात काँग्रेसकडून विक्रमादित्य सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कंगना ‘बाहेरची’ असल्याचा प्रचार केला जातो आहे. त्यामुळे या प्रकारच्या प्रचाराशी दोन हात करण्यासाठी कंगना मतदारांबरोबर स्थानिक भाषेतच बातचित करताना दिसते आहे. ती मतदारांना स्वत:सोबत सेल्फी काढू देते आहे; तसेच तिच्या प्रचाराची सुरुवातही मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊनच करत आहे. काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह हे रामपूरमधील राजघराण्याचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांना आपण स्थानिक असल्याचे दाखवण्याचा वेगळा प्रयत्न करण्याची गरज भासताना दिसत नाही.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी मणिपूरला का गेले नाहीत? अमित शाहांनी सांगितले खरे कारण

‘देवनीती’चा वापर

भाजपाची ‘क्वीन’ आणि काँग्रेसचा ‘किंग’ यांच्यात ही लढत असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे आहे. मात्र, हे दोन्हीही उमेदवार मतदारांना प्रभावित करण्यासाठी ‘देवनीती’चा अवलंब करताना दिसत आहेत. ‘देवनीती’ म्हणजे देवांचे नियम असे म्हटले जाऊ शकते. बरेचदा ‘राजनीती’ या शब्दाप्रमाणेच हिमाचल प्रदेशमध्ये त्याचा वापर केला जातो. मंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कंगना रणौत आणि विक्रमादित्य सिंह हे दोन्हीही उमेदवार या ‘देवनीती’चा वापर करताना दिसत आहेत.

कंगना रणौत मांसाहार करतात, त्यामुळे त्या ज्या मंदिरांमध्ये जात आहेत, त्या मंदिरांचे शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचा प्रचार विक्रमादित्य सिंह करत आहेत. टाकोलीमध्ये प्रचार करताना विक्रमादित्य सिंह म्हणाले की, “कंगना रणौत जे काही खातात, ते आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळे मंदिरांचे शुद्धिकरण करण्याची गरज आहे. यामुळे देवभूमीतील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.”

दुसरीकडे कंगना रणौत आपल्या प्रचारात सांगताना दिसते की, ती प्रचाराची सुरुवात स्थानिक देवतांच्या मंदिरात पूजा करूनच करते. तिचे स्थानिक महिलांबरोबर नृत्य करतानाचे तसेच मंदिर परिसराची सफाई करतानाचे व्हिडीओ प्रसारित झाले आहेत. एकीकडे राममंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याला उपस्थित न राहण्याची भूमिका काँग्रेसने घेतली होती. मात्र, तरीही पक्षाच्या भूमिकेला नकार देत विक्रमादित्य सिंह यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यामुळे मंडीमध्ये राममंदिराचा मुद्दाही प्रचारात आहे.

स्थानिक देवताही राजकीय आखाड्यात

हिमाचलमधील लोकांचा तिथल्या स्थानिक देवी-देवतांवर अधिक विश्वास आहे. त्यामुळे स्थानिक नेते देवनीतीचा वापर आपल्या प्रचारात करताना दिसतात. ज्वालामुखी विधानसभा मतदारसंघामधील काँग्रेस नेते संजय रतन यांनी नुकतेच स्थानिक देवता ज्वाला देवीच्या नावाने मते मागितल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या प्रकारानंतर भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. एप्रिलमध्ये कुल्लूमधील काँग्रेस आमदारावरही असाच आरोप झाला होता. त्यांनी रघुनाथ देवाची शपथ घालत मत देण्याचे आवाहन केले होते. मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

राज्याचे कृषी मंत्री राम लाल मारकंडा यांच्यावरही असाच आरोप लाहौल-स्पितीच्या माजी आमदाराने केला होता. मारकंडा यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पोहोचल्यानंतर हिमाचल प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त देवेश कुमार म्हणाले की, “याबाबत तपास सुरू आहे. जर मते मागण्यासाठी कुणी देवा-धर्माचा आणि परंपरेचा वापर करत असेल तर हे आचारसंहितेचे थेट उल्लंघन आहे.”

‘लूण लोटा’ची काय आहे प्रथा?

काँग्रेस नेते संजय रतन आणि इतर उमेदवारांनी देवाच्या नावाने अशाप्रकारे मते मागण्याला हिमाचलमध्ये ‘लूण लोटा’ असे म्हणतात. ही हिमाचलमधील एक प्रथा असून यामध्ये देवाच्या नावावर मतदारांना भयभीत करून मते मागितली जातात. हिमाचल प्रदेश विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक रमेश चौहान यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला शपथ घ्यायला लावताना पाण्याच्या भांड्यात लूण (मीठ) टाकले जाते. त्यानंतर असे म्हटले जाते की, जर तुम्ही शपथ मोडली तर ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळते, त्याचप्रमाणे तुमचाही नाश होईल.

प्राध्यापक चौहान पुढे म्हणाले की, “ही प्रथा सिरमौर, चंबा, मंडी, कुल्लू आणि लाहौल-स्पितीमधील लोकांमध्ये अधिक प्रचलित आहे. ज्यांनी कधीही शहर पाहिलेले नाही, असे अशिक्षित लोक यावर अधिक विश्वास ठेवताना दिसतात. हिमाचलमधील लोक ‘देव संस्कृती’ पाळतात आणि अनेक गावांमध्ये त्यांची स्वतःची प्राचीन मंदिरे आहेत आणि त्यांचा स्वत:चा वेगळा प्रभाव आहे.”

पुढे त्यांनी म्हटले की, “हिमाचलमधील खेड्यातील लोकांची त्यांच्या गावावर किंवा कुलदेवतांवर गाढ श्रद्धा असते. या देवता अजूनही त्यांचे ऐकतात आणि त्यांच्या गुरुच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधतात. काही वेळेला गावच्या प्रमुखाद्वारेही त्यांच्याशी संवाद साधतात, अशी त्यांची श्रद्धा आहे. बऱ्याच लोकांसाठी देवता याच त्यांच्या कुटुंबाच्या प्रमुख आहेत. हिमाचलमधील लोक यावर विश्वास ठेवत असल्याकारणानेच तिथले राजकारणी याचा गैरफायदा घेताना दिसतात.”

गावातील देवतांची भीती घालून मतदान

“हिमाचलमधील ग्रामीण समाज जातनिहाय विभागला गेला आहे. ही रचना अनौपचारिक असली तरीही प्रभावी आहे. बरेचदा गावचे प्रमुख लोक अनौपचारिक बैठका घेतात आणि कुणाला मतदान करायचे ते ठरवतात. मते वाया जाऊ नयेत, यासाठी गावचे प्रमुख निर्णय घेतात आणि गावकरी त्याबरहुकूम मतदान करण्याचे आश्वासन देतात. हे सगळे करताना लोकांच्या मनात देवांबद्दल असलेल्या भीतीचाच गैरफायदा घेतला जातो. ही प्रथा अजूनही हिमाचल प्रदेशमधील गावखेड्यांमध्ये सुरू असली तरीही ठोस पुराव्याशिवाय त्याबद्दल बोलता येणे कठीण आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : भाजपाविरोधात पंजाबमधील शेतकर्‍यांचा रोष, तरीही दुप्पट मतांनी निवडून येण्याचा विश्वास; कारण काय?

हिमाचल प्रदेशमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या जवळपास २६ टक्के आहे. “अनुसूचित जाती-जमातीचे लोक काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत; तर व्यापारी वर्ग भाजपालाच मत देतो. या पार्श्वभूमीवर पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते ‘लूणा लोटा’चा वापर करतात, तेव्हा मते वळण्याचीही शक्यता अधिक असते” असे ते म्हणाले.

“बरेचदा इथले मतदार दोन्ही पक्षांमध्ये संतुलन साधताना दिसतात. जर राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असेल तर भाजपाच्या खासदारांना निवडले जाते, तर भाजपाचे सरकार असेल तर काँग्रेसचे खासदार निवडण्याकडे कल असतो. थोडक्यात, समतोल साधण्याचा प्रयत्न धुमाळ सरकारच्या (२००९) काळापासून केला जात आहे”, असे एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले. पुढे ते म्हणाले की, “मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी पक्षातील अनेक वरिष्ठ नेते इच्छुक होते. मात्र, तरीही कंगनाला तिकीट देण्यात आले आहे. नावाने हाक मारण्याचा कंगनाचा स्वभावदेखील देव समाजाच्या प्रथेविरोधात जाणारा आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकांना भाजपाला मत द्यायचे असले तरीही ते गोंधळलेले आहेत.”