कर्नाटकमध्ये जानेवारी २०२१ मध्ये तत्कालीन भाजपाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात सात नवीन मंत्र्यांचा समावेश केला होता. नवीन मंत्र्यांचा समावेश केल्याने कर्नाटक भाजपातील एक गट नाराज होता. त्यातील काही नेत्यांवर मुख्यमंत्र्यांना एका खासगी व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला होता. २०१९ मध्ये भाजपा सत्तेत आल्यापासून अशा व्हिडीओची चर्चा सुरू होती. भाजपातील पक्षश्रेष्ठींनी येडियुरप्पा यांच्या वयाचे कारण पुढे करीत, जुलै २०२१ ला त्यांच्या जागी बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला आता जेमतेम काही आठवडे शिल्लक असताना, ८१ वर्षीय येडियुरप्पा पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

नेमके प्रकरण काय?

१४ मार्चला एका १७ वर्षीय मुलीच्या आईने बंगळुरू पोलिसांकडे येडियुरप्पा यांनी आपल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करीत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी पोक्सो कायदा, २०१२ आणि आयपीसीच्या कलम ‘३५४ अ’अंतर्गत तक्रार नोंदवली. हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपविण्यात आले.

येडियुरप्पा यांनी हा आरोप फेटाळला असून, ते म्हणाले, “एक किंवा दीड महिन्यापूर्वी ते (पीडित आणि तिची आई) मदतीसाठी माझ्या घरी आले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मी शहराचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांना फोनवर फोन करून, त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यास सांगितले. काही वेळानंतर ते माझ्या विरोधात बोलू लागले, तेव्हा माझ्या लक्षात आले की, त्यांना आरोग्याशी संबंधित काही समस्या आहेत. मी त्यांना शहर पोलीस आयुक्त कार्यालयात पाठवले. ते अडचणीत असल्याने मी त्यांना काही पैसेही दिले. मला कळले की, माझ्याविरोधात एफआयआर नोंदविला गेला आहे आणि मी त्याचा शोध घेईन. पण, एखाद्याला केवळ मदत केल्यामुळे माझ्यावर ही वेळ आली आहे.”

येडियुरप्पा यांच्यावरील सध्याचा आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. कारण- पोक्सो कायद्यात आरोपी व्यक्तीला त्वरित अटक करण्याची तरतूद आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये येडियुरप्पा यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांच्या निवासस्थानी काय घडले, याबद्दल पुढील आठवड्यात कर्नाटक सीआयडी पोलीस पीडितेकडून न्यायालयात औपचारिक विधान नोंदविणार असल्याची शक्यता आहे. पोक्सो पीडितेने कोर्टात दिलेल्या विधानाच्या आधारावरच पोलिस संशयितांविरुद्ध फौजदारी कारवाई करतात. अशीच फौजदारी कारवाई चित्रदुर्गातील मुरुगा राजेंद्र मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरणारू यांच्याविरोधात करण्यात आली होती.

मुरुगा मठ प्रकरण

दोन अल्पवयीन मुलींनी १ जानेवारी २०१९ ते ६ जून २०२२ मठाच्या वसतिगृहात त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे, राज्य बालकल्याण समितीच्या सदस्यांना सांगितले. त्यानंतर म्हैसूर पोलिसांनी २६ ऑगस्ट २०२२ रोजी शिवमूर्ती मुरुगा शरणारू यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील पीडितांबरोबर असणार्‍या एका स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात निवेदन दिले; ज्यानंतर १ सप्टेंबर २०२२ ला शिवमूर्ती मुरुगा शरणारू यांना अटक करण्यात आली

रमेश जारकीहोली प्रकरण

मार्च २०२१ मध्ये येडियुरप्पा सरकारमधील तत्कालीन जलसंपदा मंत्री असलेले भाजपा नेते रमेश जारकीहोली यांचा एका तरुणीबरोबरचा व्हिडीओ स्थानिक चॅनेलवर प्रसारित झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. हा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तर, जारकीहोली यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या अज्ञात टोळीविरोधात तक्रार दाखल केली होती.

४ फेब्रुवारी २०२२ ला बंगळुरू पोलिसांच्या विशेष तपास पथकाने जारकीहोली यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना पुरावे न मिळाल्याने क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला. या क्लोजर रिपोर्टला तक्रारदार महिलेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

येडियुरप्पा यांच्यावरील आरोपावर कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा म्हणाले “पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यावर आता बोलता येणार नाही. हे एक संवेदनशील प्रकरण आहे. कारण- हे आरोप माजी मुख्यमंत्र्यांवर आहेत.” येडियुरप्पा यांनी पोक्सो प्रकरणाला न घाबरता, कलबुर्गी आणि शिवमोग्गा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केलेल्या रॅलीला हजेरी लावली.

राजकीय पडसाद

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांच्याविरुद्ध सुरू असलेला खटला सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार आणि खुद्द भाजपा नेतृत्वाकडून सावधपणे हाताळला जाण्याची शक्यता आहे. कारण- ते राज्याचे सर्वोच्च लिंगायत नेते आहेत. मे २०२३ च्या राज्य निवडणुकीपूर्वी भाजपाने येडियुरप्पा यांना बाजूला केल्याने भाजपाचा पराभव झाल्याचे सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या अनेक नेत्यांनी हेच कारण पुढे केले आहे.

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भाजपातील पक्षश्रेष्ठींनी नोव्हेंबर २०२३ मध्ये येडियुरप्पा यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने राज्यातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पक्षाने आतापर्यंत नऊ जागांवर नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे.

कर्नाटकातील जगावाटपात येडियुरप्पा यांची महत्त्वपूर्ण भूमिका

शिवमोग्गा मतदारसंघातून येडियुरप्पा यांचा मोठा मुलगा बी. वाय. राघवेंद्र यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी मिळवून देण्यात येडियुरप्पा यांचा मोठा हात असल्याचे सांगण्यात येते. म्हैसूरचे माजी खासदार प्रताप सिंह आणि चिकमंगळूरसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रीय पक्षाचे माजी सरचिटणीस सी. टी. रवी यांना पक्षाने तिकीट नाकारले असून, यातही येडियुरप्पा यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते. तसेच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष नलिन कटील यांनाही मंगळुरू मतदारसंघासाठी तिकीट मिळालेले नाही. हे तिन्ही नेते येडियुरप्पा यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे बी. एल. संतोष यांच्या जवळचे मानले जातात.

भाजपाचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी येडियुरप्पा यांच्यावर हावेरी मतदारसंघातून पक्षाचे तिकीट नाकारल्याचा आरोप केला आहे. या जागेवर बसवराज बोम्मई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता ईश्वरप्पा यांनी शिवमोग्गामध्ये राघवेंद्र यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची धमकी दिली आहे. येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणार्‍या माजी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांना पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा आहे. मात्र, तरीदेखील त्यांना उडुपी-चिकमगलूर जागेवरून हलविण्यात आले आहे आणि बंगळुरू उत्तर ही जागा देण्यात आली आहे. येडियुरप्पा यांनी तुमकूर जागेसाठी माजी मंत्री व्ही. सोमन्ना यांना पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

“भाजपाच्या उमेदवारांच्या निवडीमध्ये कोणत्याही एका गटाचे म्हणणे ऐकण्यात आलेले नाही. सर्व गटांच्या पसंतीचा विचार करण्यात आला आहे. काही उमेदवारांची निवड पक्षश्रेष्ठींनी, काहींची संघ परिवाराने, तर काहींची येडियुरप्पा यांनी केली आहे,” असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. पहिल्या यादीत तिकीट न मिळाल्याने ईश्वरप्पा, जगदीश शेट्टर यांसारख्या नेत्यांना समजावण्याचे काम येडियुरप्पा यांनी केले आहे. ईश्वरप्पा यांच्या मुलाला विधान परिषदेची ऑफर देण्यात आली आहे; तर शेट्टर यांना बेळगाव येथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : मायावतींच्या बसपला आणखी एक झटका; खासदार संगीता आझाद यांचा पतीसह भाजपात प्रवेश

अण्णासाहेब जोल्ले (चिक्कोडी), भगवंत खुबा (बिदर), तेजस्वी सूर्या (दक्षिण बेंगळुरू), श्रीनिवास पुजारी (उडुपी-चिकमगलूर), सी. एन. मंजुनाथ (बेंगळुरू ग्रामीण), ब्रजेश चौटा (दक्षिण कन्नड), प्रल्हाद जोशी (दक्षिण कन्नड) हे भाजपाचे अन्य उमेदवार आहेत. भाजपाने राज्यातील २८ लोकसभेच्या तीन जागा मित्रपक्ष जनता दल (धर्मनिरपेक्ष)ला दिल्या आहेत. भाजपाने जेडी (एस) सर्वेसर्वा व माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे जावई सी. एन. मंजुनाथ यांना बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तिकीट दिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने राज्यात २५ जागा जिंकल्या होत्या.