कर्नाटकच्या राजकारणात २०१९ ची पुनरावृत्ती होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. बंगळुरूमधील राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, येत्या काही दिवसांत भाजपामधील काही आमदार काँग्रेसच्या छावणीत प्रवेश करू शकतात. भाजपाचे आमदार येत असतील तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे. कारण- येत्या काही महिन्यांत बंगळुरू महानगरपालिका आणि लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बाजू अजून भक्कम होईल. २०१९ मध्ये काँग्रेसमधील काही आमदारांनी सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या बंडखोरीमुळे जेडीएस-काँग्रेसचे सरकार कोसळले होते.

भाजपातून उडी मारून काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ करू इच्छिणाऱ्या आमदारांना टप्प्याटप्प्याने प्रवेश दिला जाईल, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. यशवंतपूर मतदारसंघातील भाजपा आमदार एस. टी. सोमशेखर यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. माजी सहकारमंत्री असलेले एस. टी. सोमशेखर हे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री व बंगळुरू विकासमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासमवेत केम्पेगौडा लेआऊटच्या कामाची पाहणी करण्यासाठी एकत्र दिसले होते. त्याबद्दल बोलताना सोमशेखर म्हणाले की, शिवकुमार हे माझे गुरू आहेत. त्यांनीच मला सहकार क्षेत्रात मोठे होण्यासाठी मदत केली. म्हणून मी त्यांचे स्वागत केले.

हे वाचा >> २०१९ साली बंडखोरी करून जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या त्या ‘१७’ आमदारांचे काय झाले? किती जिंकले, हरले?

सोमशेखर यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसच्या १४ आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी २०१९ मध्ये आमदारकीचा राजीनामा देऊन बंडखोरी केली होती. पोटनिवडणुकीत विजय मिळवून त्यापैकी १८ आमदार भाजपाला जाऊन मिळाले होते. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- सोमशेखर, शिवराम हेब्बर, बैराथी बसवराजू व के. गोपालह्या यांनी काँग्रेसमध्ये परतण्याबद्दल इच्छा व्यक्त केली आहे आणि त्याप्रमाणे त्यांची चर्चा झाल्याचेही सांगण्यात येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- काँग्रेसमधून २०१९ साली भाजपामध्ये गेलेले आमदार काही दिवसांपासून
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी ‘घरवापसी’संदर्भात चर्चा करीत आहेत.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, ज्यांनी याआधी काँग्रेसमध्ये काम केले आहे, त्यांना जर पुन्हा पक्षात यायचे असेल, तर त्यांचे स्वागतच आहे. “सोमशेखर काँग्रेसमध्ये असताना बंगळुरू शहराचे जिल्हाध्यक्ष होते आणि मी कर्नाटक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. तीन वेळा आमदार राहिलेले सोमशेखर जर पक्षात थांबले असते, तर आज ते मंत्री झाले असते. ते परत आले, तर इतर काँग्रेस नेते त्यांना विरोध करणार नाहीत”, अशी प्रतिक्रिया परमेश्वर यांनी दिली.

आणखी वाचा >> भाजपाने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा काँग्रेसने केला रद्द; सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार मुनीरत्न हेदेखील ‘घरवापसी’साठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेसशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर त्यांना राजाराजेश्वरी नगर विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा देऊन विधान परिषदेवर येण्याचा प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव भाजपा आमदार मुनीरत्न यांनी फेटाळला असून, त्यांना विधानसभेचे आमदार म्हणूनच आपली कारकीर्द पुढे न्यायची आहे.