कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र निवडणूक कार्यक्रम कधीही घोषित होऊ शकतो. हीच शक्यता लक्षात घेऊन येथे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. कर्नाटकमधील रामगनगर हा विधानसभा मतदारसंघ प्रत्येक निवडणुकीत चर्चेचा विषय असतो. या वेळी या जागेवरून काँग्रेसतर्फे डी के सुरेश निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. डी के सुरेश हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचे बंधू आहेत. या जागेवरून जेडी (एस) पक्षातर्फे निखील कुमारस्वामी हे निवडणूक लढवणार आहेत. निखील कुमारस्वामी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचे पुत्र आहेत. त्यामुळे रामनगर मतदारसंघातील निवडणूक चांगलीच चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> कर्नाटक, महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी BRS चे प्लॅनिंग काय? के कवितांनी सांगितले; म्हणाल्या “अनेक नेते…”

रामनगर जागेवर डी के सुरेश यांना संधी

डी के सुरेश सध्या बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना रामनगर या जागेसाठी तिकीट दिले जाऊ शकते. तसे संकेत डी के शिवकुमार यांनी दिले आहेत. “रामनगर मतदारसंघाच्या निवडणुकीत डी के सुरेश यांना संधी द्यायला हवी, असा एक सूर आहे. मी याबाबत अद्याप सुरेशशी चर्चा केलेली नाही. हा एक मोठा निर्णय आहे. त्यामुळे मी यावर अजूनही विचार करत आहे,” असे डी के शिवकुमार म्हणाले.

स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा तसा आग्रह आहे

सुरेश यांच्याबाबतच्या सूचना हायकमांडतर्फे देण्यात आली आहे, की प्रदेश काँग्रेसचे तसे मत आहे? असे विचारला असता, “मी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचा अध्यक्ष आहे. सुरेश यांना रामनगर मतदारसंघासाठी संधी द्यावी, अशी मागणी करणारे काही प्रस्ताव आहेत. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा तसा आग्रह आहे,” अशी माहिती डी के शिवकुमार यांनी दिली.

हेही वाचा >> कर्नाटक, महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी BRS चे प्लॅनिंग काय? के कवितांनी सांगितले; म्हणाल्या “अनेक नेते…”

दोन्ही नेते करतात वोक्कालिगा समाजाचे प्रतिनिधीत्व

काँग्रेसने सुरेश यांना रामनगर मतदारसंघातून संधी दिल्यास ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे. कारण डी के सुरेश आणि निखील कुमारस्वामी हे दोन्ही नेते कर्नाटकमधील वोक्कालिगा समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे नेते आहेत. सध्या रामनगरचे प्रतिनिधूत्व एच डी कुमारस्वामी यांच्या पत्नी आणि निखील यांच्या आई अनिता या करत आहेत.

हेही वाचा >> भाजपाला बिहारमध्ये हवे आहेत नवे सहकारी; केंद्रीय सुरक्षा व्यवस्था देऊन नवे सहकारी जोडण्याचा प्रयत्न

तीन दशकांपासून दोन कुटुंबांमध्ये राजकीय वैर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामनगर हा मतदारसंघ जेडी (एस) पक्षाचा बालेकिल्ला आहे. २०१८ साली पार पडलेल्या निवडणुकीत कुमारस्वामी यांनी रामनगर आणि छन्नपटना अशा दोन्ही जागांवर विजय मिळवला होता. मात्र जेडी (एस) आणि काँग्रेस यांच्यात तेव्हा युती असल्यामुळे शिवकुमार यांच्या विनंतीनंतर कुमारस्वामी यांनी रामनगर ही जागा सोडली होती. या निर्णयानंतर कुमारस्वामी आणि शिवकुमार परिवारात असलेले तीन दशकांपासूनचे राजकीय वैप मिटले, असे म्हटले जात होते. मात्र डी के सुरेश आणि निखील कुमारस्वामी यांच्यात लढत होण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा एकदा या दोन कुटुंबांत राजकीय शत्रुत्व निर्माण होते की काय? असा प्रश्न विचारला जात आहे.