पंजाबमधील लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ‘आप’ने पहिल्या यादीत आठ उमेदवारांची नावे दिली आहेत. दिल्लीच्या धर्तीवर आम आदमी पक्षानेही बहुतांश आमदारांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने ज्या उमेदवारांना तिकीट दिले, त्यात भगवंत मान सरकारमधील विद्यमान आमदार आणि मंत्री यांचा समावेश आहे. आम आदमी पार्टीच्या या यादीत एका अशा नावाचाही समावेश आहे, जे ऐकून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे नाव आहे विनोदवीर, अभिनेता आणि गायक करमजीत अनमोल याचं. ‘आप’ने त्याला फरिदकोटमधून उमेदवारी दिली आहे. करमजीत अनमोल पंजाबमधील विनोदी अभिनेता आणि गायक म्हणून परिचित आहे. त्याने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. करमजीत हा पंजाबी लोक गायक कुलदीप मानक यांचा पुतण्या आहे. करमजीत अनमोल हा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचाही जवळचे मित्र असल्याचे सांगितले जाते. खरं तर मोहम्मद सादिक सध्या फरिदकोटमधून काँग्रेसचे खासदार आहेत. मोहम्मद सादिक हे प्रसिद्ध पंजाबी गायक आहेत.

अनमोल हा भगवंत मान यांचा जवळचा मित्र असून, तो संगरूर जिल्ह्यातील गांडुआ गावचा रहिवासी आहे. खरं तर त्याला संगरूरमधून निवडणूक लढवायची होती. पण मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की, एका कलाकाराने संपूर्ण पंजाबचे प्रतिनिधित्व करण्यास तयार असले पाहिजे. त्यामुळे मी फरीदकोटमधून निवडणूक लढवण्यास तयार झालो, असे अनमोल यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. आपल्या पहिल्याच निवडणुकीसाठी अनमोल सज्ज झाला असून, शनिवारी त्याने फरीदकोट लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह AAP कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तसेच टिल्ला बाबा फरीद तीर्थक्षेत्रासह फरिदाकोट मतदारसंघाचाही दौरा केला. पक्षाने फरिदाकोटसाठी अनमोलची निवड केल्याचा आम्हाला आनंद आहे, असं फरिदाकोट लोकसभा मतदारसंघांच्या अंतर्गत येणाऱ्या कोटकपुराचे आमदार कुलतार सिंग संधवान म्हणाले.

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

परंतु अनमोल यांच्या निवडीवर आपमधीलच काही जण नाराज असल्याचं बोललं जातंय. पक्षाने बाहेरच्या उमेदवाराला संधी दिलीय, मान यांचा मित्र असल्यानेच अनमोलला तिकीट मिळाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ५२ वर्षीय करमजीत अनमोल हा दिग्गज लोकगायक कुलदीप मानक यांचा पुतण्या असून, अभिनयाकडे जाण्यापूर्वी मान यांच्याबरोबर कॉमेडी करत मनोरंजन क्षेत्रातून त्याने आयुष्याला सुरुवात केली. त्याने कॅरी ऑन जट्टा 2, अरदास आणि सरदार साहिब यांसारख्या लोकप्रिय पंजाबी भाषेतील हिट चित्रपटांमध्ये काम केले आणि बॉलीवूड चित्रपट देव डीमध्येसुद्धा त्याला पाहायला मिळाले होते. त्याच्या तिकिटाची घोषणा होण्याच्या काही तास आधी अनमोल त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्याच्या नवीन गाणे मिर्झाचा प्रचार करीत होता. शुक्रवारी त्याने ‘मिशन रंगला पंजाब (मिशन समृद्ध पंजाब)’चा भाग बनवल्याबद्दल मुख्यमंत्री भगवंत मान आणि ‘आप’चे आभार मानणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. पोस्टमध्ये सीएम मान आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरचा पिवळ्या पगडीतील फोटो शेअर केला होता. मृदुभाषी अनमोलमुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलेल्या अनेक आप कार्यकर्त्यांच्या मनात डावलल्याची भावना आहे. २०१४ पासून ते पक्षासाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करीत आहेत.

“मी राजकारणात येण्याचा कधी विचार केला नव्हता, पण माझ्या गावातील लोक मला नेहमी सांगायचे की, एक दिवस मी राजकारणी होईन. मला या भागातील ज्वलंत समस्या समजून घ्यायच्या आहेत आणि त्यांना संसदेत ठळकपणे मांडायचे आहे,” असंही अनमोल सांगतो. सतत इतरांवर टीका करण्यापेक्षा सकारात्मक राजकारण करण्यावर त्याचा विश्वास आहे. अनमोललाही त्याची अभिनय कारकीर्द सुरू ठेवायची आहे. मी दोघांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करेन,” असंही तो पुढे म्हणाला. “तुम्ही मला आता कलाकार किंवा नेता म्हणू शकता, कारण आता मी दोन्ही आहे.”

फरिदकोट ही एक प्रतिष्ठित जागा म्हणून ओळखली जाते

फरिदकोट ही एक प्रतिष्ठित जागा म्हणून ओळखली जाते, याच जागेवरून १९७७ मध्ये अकाली दलाचे टायटन आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांची पहिली खासदार म्हणून निवड केली होती. त्यांचा मुलगा सुखबीर सिंग बादल यांचा राजकीय प्रवासही याच जागेवरून सुरू झाला, जेव्हा ते १९९६ मध्ये खासदार झाले. १९९९ मध्ये सुखबीर यांना या जागेवरून काँग्रेसकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. २००४ मध्ये सुखबीरने फरिदकोट परत मिळवले होते. २००९ मध्ये ही जागा आरक्षित झाल्यानंतर अकाली दलाच्या परमजीत कौर गुलशन येथून विजयी झाल्या. २०१४ मध्ये जेव्हा AAP ने पंजाबमध्ये पदार्पण केले, तेव्हा गुलशन यांना आपकडून १.२ लाख मतांनी पराभव पत्करावा लागला. २०१९ मध्ये काँग्रेसच्या मोहम्मद सादिक यांनी फरिदकोट जिंकले, आप उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. सादिक हे एक लोकप्रिय पंजाबी लोक कलाकारदेखील आहेत आणि चरणजीत सिंग चन्नी (पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री) यांच्या व्यतिरिक्त फरिदकोटमधून काँग्रेसच्या तिकिटासाठी ते सर्वोच्च दावेदार आहेत.

AAP ला फरिदकोट जिंकण्याचा विश्वास आहे, कारण लोकसभा मतदारसंघांतर्गत नऊ विधानसभा क्षेत्रांपैकी एक असलेला गिद्दरबाहा मतदारसंघ २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने थोड्या मतांच्या फरकाने गमावला होता. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वारिंग हे गिद्दरबाहातून विजयी झाले होते. फरिदकोटसाठी इतर कोणत्याही पक्षाने अद्याप त्यांचे उमेदवार घोषित केले नसल्यामुळे अनमोलचा असा विश्वास आहे की, त्यांना पहिल्या निवडीचा फायदा मिळेल.

AAP उमेदवारांची निवड

लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करताना पक्षानं काही काळजी घेण्याची गरज आहे. कारण आप ही कोणत्याही विचारधारेशी एकनिष्ठ नाही. २०२२ च्या निवडणुकीत आपने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली, मतदारांनीही परिवर्तनासाठी आपच्या उमेदवारांना पसंती दिली. परंतु आपने लोकसभेच्या निवडणुकीतही पाच विद्यमान मंत्र्यांना उभे केले आहे. कुलदीप सिंग धालीवाल (अमृतसर), लालजीतसिंग भुल्लर (खदूर साहिब); बलबीर सिद्धू (पटियाला); गुरमीत सिंग खुदियान (भटिंडा); गुरमीत सिंग मीत हैर (संगरूर) या मंत्र्यांचा त्या यादीत समावेश आहे. आपने अनेक नेत्यांना जोडून न ठेवल्यामुळेच बरेच जण त्यांना सोडून गेले, सीएम मान आणि केजरीवालांनी व्यावहारिक हेतूंसाठी अनेक चांगले नेते आणि कार्यकर्त्यांना दुखावल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खरं तर यातीलही बलबीर सिद्धू (पटियाला) आणि गुरमीत सिंग मीत हैर (संगरूर) यांनाच खरे आपचे म्हणता येतील, कारण इतर नेते काँग्रेसमधून आपमध्ये प्रवेश करून ते निवडून आले आहेत. तिकीट मिळालेले इतर दोन उमेदवार सुशील कुमार रिंकू (जालंधर) आणि गुरप्रीत सिंग जीपी (फतेहपूर साहिब) यांनीही काँग्रेसमधून पक्षात प्रवेश केला आहे. फरिदकोटमधील जागा अनमोलला दिल्यानंतर फतेहपूर साहिबची राखीव जागा काँग्रेसमधून घेतलेल्या गुरप्रीत सिंगकडे गेली आहे, तर होशियारपूर काँग्रेसचे विद्यमान आमदार राजकुमार छाबेवाल यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे, जे शुक्रवारी आपमध्ये सामील झाले आहेत. ‘आप’च्या एका आमदाराने असा युक्तिवाद केला की, पक्षाने जिंकण्याची क्षमता पहिली ठेवली पाहिजे. “पक्ष विकसित होत आहे. कधी कधी परिस्थितीचाही विचार करावा लागतो. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे आणि आपण प्रत्येक जागेवर योग्य पाऊल टाकले पाहिजे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. सध्या लोकशाही वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जास्तीत जास्त जागा जिंकणे हा आहे. याची खिल्ली उडवताना अकाली दलाचे माजी आमदार विरसा सिंग वलटोहा म्हणतात, आपने नेहमीच जनतेची फसवणूक केली आहे. जे सांगतात त्याच्या विरुद्ध वागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आपमध्ये केजरीवालच पहिल्या दिवसापासूनच पक्षाचा चेहरा असून, त्यांच्या मागे कोणी नसल्याचंही ते सांगतात.”