विविध प्रतिनिधींकडून

छत्रपती संभाजीनगर, लातूर, उसमानाबाद : ‘ही माझी शेवटची निवडणूक’ असा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराचा भावनिक मुद्दा. दुसरा मुद्दा ‘मी कोणाचं वाईट केलं नाही’ आणि पुढे जात चंद्रकांत खैरे म्हणतात, ‘गेल्या वेळी चूक केली होती, ती आता पुन्हा करू नका’ या काही वाक्यांसह चंद्रकांत खैरे प्रचारात उतरले आहेत. दुसरीकडे एमआयएमचे नेते असदोद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांनी केवळ एकाच समुदायासाठी काम केले आहे का, त्यांनी त्यानी हिंदू- मुस्लिमांमध्ये वाद घडावा असे प्रयत्न केले का, त्यांनी दलितांवर अन्याय होणाऱ्यांची साथ केली का, असा प्रश्न विचारत प्रचार सुरू केला आहे.

३० वर्षं ज्यांनी ‘खान की बाण’ असा प्रचार केला त्यांचा बाण कुठे गेला, असा असा प्रश्न विचारत ओवेसींनी टीका करायला सुरुवात केली आहे. तुमची शेवटची निवडणूक २०१९ मध्येच झाली. आता ही निवडणूक तुमची नाही, अशी टीका आता सुरू झाली आहे. या सर्व प्रचार धुराळ्यात ‘महायुती’चा उमेदवार ठरलेला नसल्याने शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे नेते शांत आहेत. यातील केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे हिंगोली, परभणी आणि नांदेड लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी अद्यापि भाजपला जागा मिळावी यासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवले असले तरी ते आता पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे भाजपचे कार्यकर्तेच सांगतात. चंद्रकांत खैरे यांनी मात्र सर्व जुने संबंध वापरुन गाठीभेटींना सुरूवात केली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ना शिवसेनाचा शिंदे गट सक्रिय आहे ना भाजप. त्यामुळे पहिल्या टप्प्यात प्रचार लढा ठाकरे गट विरुद्ध एमआयएम असा सुरू आहे.

आणखी वाचा-उमेदवारीचेही बनावट पत्र !

उस्मानाबाद : शेतकऱ्या घरातील गाय आजारी पडल्यावर पशू वैद्यकीय अधिकारी सापडत नव्हता. तेव्हा त्याने खासदाराला फोन केला. त्या गायीला उपचार देण्यासाठी डॉक्टराला त्या गावापर्यंत पाठविणारा लोकप्रतिनिधी अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते ओम राजेनिंबाळकर यांची प्रतिमा प्रचारात पुढे केली जात आहे. काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी महाविकास आघाडीतील या उमेदवाराचे नुकतेच कौतुक केले. दुसरीकडे संपर्काच्या आधारावर आणि पुढे जाताना सर्वसामांन्याबरोबरचा संपर्क हा ओम राजेनिंबाळकरांनी प्रचाराचा मुद्दा केला आहे तर पद्मसिंह पाटील यांना जर अपयशी ठरवत असाल तर तेव्हाचे कारभारी हे पवन राजेनिंबाळकर होते, तेही अपयशीच होते, हे मान्य करा, असा प्रचार आता महायुतीकडून केला जात आहे. प्रचाराचा प्रमुख मुद्दा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी निवडून द्या, हाच असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा-काँग्रेससारखे डावे पक्ष अल्पसंख्याकांचे संरक्षण करू शकत नाहीत, केरळच्या IUML प्रमुखांना विश्वास

लातूर : शेतमालाला न मिळणारा हमीभाव, बेरोजगारीची वाढती समस्या, महिला संरक्षण हे मुद्दे आहेत काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांचे. मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, उद्योगाच्या अडचणी, रेल्वेच्या समस्या, यावर बोलताना काँग्रेसचे नेते लिंगायत मतपेढीला हात घालत आहेत. डॉ. काळगे हे माला जंगम समाजाचे आहेत. त्यामुळे बौद्ध समाजाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याची त्यांच्यावर टीका होते आहे. तो मुद्दा खोडून काढताना काळगे म्हणतात, अतिसूक्ष्म मागास जातीचा मी प्रतिनिधी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे ६०-७० जातींचा समावेश आरक्षणामध्ये केला आहे. त्यामुळे कधीतरी आमच्यासारख्या छोट्या समाजालाही प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार सुधाकर शृंगारे याच्याकडून रेल्वेची पिट लाईन, लातूर-पुणे इंटरसिटी, लातूर रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकीकरण, दिव्यांगाना सर्वेक्षण करून त्यांना उपकरण पोहोचवण्यात असणारा संवेदनशीलपणा प्रचाराचा मुद्दा होऊ पाहत आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपची नीतीच योग्य असल्याचा प्रचार लातूर मतदारसंघात सुरू आहे.