निवडणुकीच्या हंगामात कधी कोणाला महत्त्व येऊ शकते. अशाच दोन जानकरांची सध्या अशीच चर्चा आहे. ‘रासप’चे महादेव जानकर हे महाविकास आघाडीतून माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झाले होते.  पण अचानक सूत्रे हलली. जानकर हे महायुतीच्या गोटात दाखल झाले. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचे छायाचित्र झळकले. लगेचच परभणी मतदारसंघातून जानकरांची उमेदवारी जाहीर झाली. दुसरे उत्तम जानकर. सोलापूर व माळशीरस मतदारसंघापुरतेच त्यांचे नाव. माढा मतदारसंघात मोहिते-पाटील कुटुंबीयाने बंड केल्याने उत्तम जानकरांना एकदमच महत्त्व प्राप्त झाले. जानकर हे मोहिते-पाटील यांचे पारंपरिक विरोधक. नागपूर मुक्कामी असलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी यावे म्हणून जानकरांसाठी सोलापूरमध्ये विशेष विमान पाठविण्यात आले. जानकर नागपूरवारी करून आले. जानकर महायुतीबरोबर जाणार असे चित्र असतानाच अचानक बुधवारी ते शरम्द पवारांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल झाले. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस महत्त्व देतात यामुळे हे जानकर आहेत तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला. काही असो, निवडणुकीच्या काळात अशाच नेत्यांना महत्त्व प्राप्त होते.

माझा पक्ष माझी जबाबदारी

 महायुती असो की महाविकास आघाडी. दोन्हीकडे तीन प्रमुख पक्ष आणि मित्रपक्ष यांची गर्दी झालेली. साहजिकच उमेदवाराचा प्रचार करताना एकजूट दिसावी असे नियोजन असते. पण नेत्यांनी त्यांच्या सोयीनुसार दौरा ठरवलेला असतो. त्यामुळे होते असे की एकाच वेळी तिन्ही पक्षांचे प्रमुख मंचावर येणे जवळपास अशक्य. अशा वेळी ज्या पक्षाचा नेता येईल त्या पक्षाचे पदाधिकारी मंचावरून उठतात आणि स्वागतासाठी सभागृहाबाहेर पोहोचतात. त्यांना स्थानापन्न करून काही वेळ होतो ना होतो; तोच दुसऱ्या पक्षाचा नेता येतो. आणि त्यांचे पदाधिकारी स्वागतासाठी धावत सुटतात.

तिन्ही पक्ष एकदिलाने लढत असल्याचे दिसत असले तरी नेत्यांच्या आगमनावेळी त्या त्या पक्षाचेच पदाधिकारी पुढे सरसावतात. एकीकडे ऐक्य दाखवताना दुसरीकडे हे चित्र गमतीशीर तितकेच मनोरंजक, लक्षवेधी ठरत असल्याने सभास्थळी त्यावरून पक्षाच्याच कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज होत राहते.

हेही वाचा >>>बॉलीवूड रॅपर, सापाच्या तस्करी प्रकरणात नाव आणि आता लोकसभेची उमेदवारी

आता भिस्त श्रीरामावरच..

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी गेल्या शुक्रवारी अधिसूचना जारी झाली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी वाजत-गाजत अर्ज दाखल केला.  याव्यतिरिक्त दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. पण राऊत यांचा खरा प्रतिस्पर्धी असलेला महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत ही दोन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. पण धक्कातंत्राचा अवलंब करत भाजपचे श्रेष्ठी तिसरीच व्यक्ती रिंगणात उतरवू शकते, अशीही चर्चा आहे.  रामनवमीच्या मुहूर्तावर ही कोंडी फुटेल आणि महायुतीकडून एकदाचा या मतदारसंघाला  उमेदवार जाहीर होईल, अशी स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांची अटकळ होती. पण तेही झालं नाही. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत आणि त्यानंतर प्रचारासाठी अवघे सोळा दिवस मिळणार आहेत.  अशा परिस्थितीत दोन जिल्हे व्यापून असलेल्या मतदारसंघात इतक्या कमी काळात मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे, हा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडलेला आहे. याबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता एकाने मासलेवाईक प्रतिक्रिया देत सांगितलं, आता सारी भिस्त श्रीरामावर! तोच काय ते बघून घेईल!

आधी पाण्याची अन् नंतरच प्रचाराची गाडी.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असल्यामुळे राजकारण तापले असताना इकडे सोलापूर जिल्ह्यात अंगाची लाही लाही करणाऱ्या प्रखर उन्हाळय़ात दुष्काळाची तीव्रताही वाढत आहे. एकीकडे राजकीय प्रचाराचा धुरळा आणि दुसरीकडे दुष्काळाची दाहकता असताना प्रशासनाचा जास्त वेळ निवडणूक यंत्रणा राबविण्यातच खर्च होऊ लागल्याचे दिसते. परिणामी, ग्रामीण भागात पाण्याच्या टँकरसाठी वाट बघावी लागत आहे.

वीजपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्यामुळे शेतकरी वैतागला आहे. करमाळा तालुक्यात त्याचा आलेला अनुभव बरेच काही सांगून जातो.  करमाळय़ाजवळील अनेक गावे पाण्यासाठी तहानलेली असताना मागणी करून पाण्याचा टँकर येत नाही. परंतु निवडणूक प्रचाराच्या गाडय़ा येतात. त्यामुळे तहानलेल्या गावकऱ्यांचा संयम ढळला. आधी पाण्याची गाडी येऊ द्या आणि नंतर प्रचाराच्या गाडय़ा, असा चढलेला ग्रामस्थांचा सूर लक्षात घेता प्रचाराच्या गाडय़ांनी गावातून काढता पाय घेतला.

‘बिनटाक्याची शस्त्रक्रिया’

धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे इच्छुक होते. मतदारसंघात त्यांनी ऐनवेळी त्यांचे तिकीट कापले गेले. एका डॉक्टरचे तिकीट कापून पक्षाने दुसऱ्या डॉक्टरला म्हणजे माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना दिले. रागाच्या भरात डॉ. शेवाळे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाशिक येथे आयोजित काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या समक्ष आपले शल्य मांडून त्यांना टोले हाणले. ज्येष्ठ नेते थोरात हे कमी बोलतात. पण ते हसले की, काहीतरी वेगळे घडणार, हे आपण समजून घ्यायचे. कमी बोलून त्यांनी अनेक राजकीय शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्याकडून बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली जाते. त्यांनी आपलीही तशीच शस्त्रक्रिया केली, असे डॉ. शेवाळे यांनी सांगताच  थोरात यांनाही हसू आवरले नाही.

साडेपाच पक्ष विरुद्ध इम्तियाज जलील

दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना आणि एक भाजप हे पाच आणि अर्धी काँग्रेस असे साडेपाच पक्ष इम्तियाज जलील यांच्या विरोधात उभे   ठाकले आहेत. आता त्यांच्या विरोधात एमआयएमचा एकटा पठ्ठया उभा आहे असे सांगत ओवेसी आता भावनिक पातळीवर औरंगाबादमध्ये प्रचार करू लागले आहेत. काही चूक झाली असेल तर फोन करा. मी येतो. तुमच्या घरी येतो. पण केवळ राग म्हणून एकजूट तोडू नका, असे आवाहन ते करत फिरत आहेत. तीन मतदारसंघांत सभा घेतल्यानंतर त्यांचे या वेळी एकसुरी होते. साडेपाच पक्ष विरुद्ध एमआयएम अशी लढत रंगवली जात आहे.

(संकलन : संतोष प्रधान, सतीश कामत, एजाज हुसेन मुजावर, सुहास सरदेशमुख, अनिकेत साठे, दयानंद लिपारे)