Mahayuti Votes Division in Amravati District : जिल्‍ह्यात अनेक‍ बंडखोरांना रोखण्‍यात भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांना यश आले असले, तरी भाजपच्‍या चार बंडखोर उमेदवारांनी तलवार म्‍यान करण्‍यास नकार दिला. त्‍यातच दर्यापूरमध्‍ये शिवसेनेच्‍या विरोधात (एकनाथ शिंदे) महायुतीतील घटक युवा स्‍वाभिमान पक्ष आणि मोर्शी मतदारसंघात भाजप तसेच राष्‍ट्रवादी समोरा-समोर आले आहेत. या बंडखोरीमुळे महायुतीसमोर मतविभाजनाचा धोका कायम आहे.

मोर्शीत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) देवेंद्र भुयार यांच्‍या विरोधात भाजपने उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली. या ठिकाणी आता मैत्रिपूर्ण लढत होईल. मात्र, भाजपमध्‍ये उफाळून आलेली बंडखोरी रोखणे हे मोठे आव्‍हान होते. उमेश यावलकर यांच्या विरोधात भाजपचे अतिरिक्त विधानसभा प्रमुख अमित कुबडे, माजी विधानसभा प्रमुख डॉ मनोहर आंडे, राजेंद्र आंडे, श्रीधर सोलव आदींनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. या बंडखोरांची समजूत काढण्‍यात भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांना बरेच परिश्रम घ्‍यावे लागले. या प्रमुख बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्‍याने भाजपला दिलासा मिळाला आहे. पण, महायुतीत फूट पडली आहे.

अचलपूरमध्‍ये नंदकिशोर वासनकर, अक्षरा लहाने आणि ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल यांच्‍या बंडखोरीने भाजपसमोर संकट निर्माण केले होते. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड इत्‍यादी नेत्‍यांनी बंडखोरांशी संपर्क साधून समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्‍या मध्‍यस्‍तीनंतर नंदकिशोर वासनकर, अक्षरा लहाने यांनी माघार घेतली, पण ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल यांनी हिंदुत्‍वाचा नारा देत बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. या ठिकाणी मतविभाजनाची शक्‍यता आहे.

दर्यापूरमध्‍ये महायुतीत उभी फूट आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात भाजपचे माजी आमदार रमेश बुदिले हे महायुतीचे घटक असलेल्‍या युवा स्‍वाभिमान पक्षातर्फे तंबू ठोकून आहेत. दुसरीकडे, बडनेरात युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्‍या विरोधात भाजपचे बंडखोर तुषार भारतीय हे आपल्‍या बंडखोरीच्‍या निर्णयावर अखेरपर्यंत ठाम राहिले. त्‍यामुळे रवी राणांच्‍या अडचणी कायम आहेत.

हे ही वाचा… East Vidarbha assembly election 2024 : पूर्व विदर्भातील पाच प्रमुख लढतींकडे राज्याचे लक्ष

अमरावतीत भाजपचे बंडखोर उमेदवार माजी पालकमंत्री जगदीश गुप्‍ता यांनीही लढतीत कायम राहण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यामुळे महायुतीसमोरील आव्‍हाने संपलेली नाहीत. मेळघाटमध्‍ये भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्‍या माघारीने महायुतीला दिलासा, पण भाजपच्‍या बंडखोर ज्‍योती सोळके यांची समजूत काढण्‍यात अपयश आल्‍याने चिंता अशी स्थिती आहे. तिवसातून भाजपचे बंडखोर उमेदवार रविराज देशमुख यांची प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षपदी नियुक्‍ती केली आणि त्‍यांनी माघार घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीतही बंडखोरी

मेळघाटमध्‍ये कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार मन्‍ना दारसिंबे यांनी माघार घेतल्‍याने महाविकास आघाडीला दिलासा मिळाला असला, तरी मोर्शीतून राष्‍ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गिरीश कराळे यांच्‍या विरोधात विक्रम ठाकरे यांची बंडखोरी कायम आहे, तर बडनेरात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे सुनील खराटे यांच्‍या विरोधात प्रीती बंड लढतीत आहेत.