नंदुरबार : अवघे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या शहादा-तळोदा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ३६,४१८ अधिक मतदान झाले आहे. भाजपचे आमदार राजेश पाडवी, काँग्रेसचे राजेंद्र गावित आणि अपक्ष गोपाल भंडारी या तिघांपैकी मुख्य लढत पाडवी आणि गावित यांच्यात आहे.

पाडवी यांचा मागील निवडणुकीत ७९९१ मतांनी विजय झाला होता. परंतु, थेट लढत काँग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याची मानले जात आहे. या मतदारसंघावर नेहमीच काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. २०१४ मध्ये काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपने हादरा दिला. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी थेट हेलिकॉप्टरने येत या मतदारसंघातील इतर इच्छुकांची नाराजी दूर केल्याने महाविकास आघाडी एकसंघ राहिली. निवडणुकीआधी भाजपचा राजीनामा दिलेले राजेंद्र गावित यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. गावित हे डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू असले तरी त्यांच्यात वाद असल्याने दोन्ही भाऊ दोन पक्षांमध्ये आहेत.

हेही वाचा : मराठवाड्यात सिल्लोड मतदानात अग्रेसर, महिला मतदारांचे प्रमाणही ७९.४१ टक्के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावित, पाडवी की भंडारी…?

२०१४ मध्ये मुलाला उमेदवारी दिल्याने माजी आमदार उदेसिंग पाडवी आणि पुत्र राजेश पाडवी यांच्यातही कटूता निर्माण झाली होती. याच कटूतेतून उदेसिंग यांनी या मतदारसंघातून मुलाविरोधात लढण्याची तयारी केली होती. परंतु ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलला. दुसरीकडे, डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी जमत नसलेले भाजप कार्यकर्ते या मतदारसंघात राजेश पाडवींसाठी काम करताना दिसून आले. गावित आणि पाडवी यांच्या मुख्य लढतीमुळे अपक्ष उमेदवार गोपाल भंडारी झाकोळले गेले. मतदानाचा टक्का वाढल्याने तो कोणाला फायदेशीर ठरणार, याची आकडेमोड कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.