नागपूर : भाजपने राज्यात जबरदस्त ‘कमबॅक’ केल्यानंतर या पक्षाच्याच काही नेत्यांसह अनेक राजकीय विश्लेषकांनी या अनपेक्षित विजयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. अशाच प्रकारे दक्षिण नागपुरातून भाजपचे मोहन मते यांचा आधीपेक्षा अधिक मताधिक्याने झालेल्या विजयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ओबीसी मतांचे ध्रुवीकरण आणि लाडकी बहिणींचे झालेले भरभरून मतदान मतेंच्या पथ्यावर पडले. पुन्हा एकदा काँग्रेसचे गिरीश पांडव यांचे आमदार होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

मोहन मते यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढताना आक्रमक प्रचार केला होता. हिंदूत्वाचा पुरस्कार करून त्यांनी मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भर दिला होता. सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने आणि नासुप्रचे विश्वस्त असल्याने त्यांना काही विकास कामे दाखवण्याची संधी मिळाली. सोबतीला भाजपची संघटनशक्ती आणि संघ परिवारातील संघटना होत्या. या संघटना त्यांच्या पाठिशी राहिल्या. संघ परिवारातील संघटनांचे ज्येष्ठ नागरिक घरोघरी फिरले. यामुळे विखुरलेली ओबीसी मते भाजपकडे वळली. ओबीसीमधील महिलांवर लाडकी बहिणी योजनेचा पगडा अधिक जाणवत होता. भाजपने तसा प्रचार केला होता. आपण परत सत्तेत न आल्यास योजना बंद होईल, असा तो प्रचार होता. योजना बंद पडण्याची भीती दाखवण्याची खेळी यशस्वी झाली आहे. ओबीसी महिला आणि पुरुषांचे मोठ्या प्रमाणात मते भाजपला पडली. त्यामुळे अनपेक्षितपणे मोहन मतेंना १ लाख १५ हजारांहून अधिक मते मिळाली आणि गिरीश पांडव यांच्यापेक्षा १५ हजारांहून अधिक मते घेऊन पुन्हा एकदा दक्षिणचा किल्ला राखला.

हेही वाचा – रायगड जिल्ह्यात शेकापच्या जनाधाराला ओहोटी, पाटी कोरी

हेही वाचा – पालघर जिल्ह्यात प्रस्थापितांविरुद्ध कौल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यासाठी हा पराभव धक्कादायक ठरला आहे. गेल्या निवडणुकीतील अल्पमताने पराभव झाल्यानंतर ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात सक्रिय होते. त्यांनी युवक आणि महिला कार्यकर्त्यांची फौज कामाला लावली होती. गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघातील लोकांच्या संपर्कात होते. पण, ते भाजप आणि संघ परिवारातील संघटनांचे ओबीसींच्या ध्रुवीकरणास रोखू शकले नाही. भाजपने वंचित बहुजन आघाडी आणि बसपाच्या माध्यमातून मतविभाजन न करता अतिशय चुरशी वाटणारी ही लढाई मोठ्या अंतराने जिंकली. वंचित बहुजन आघाडीच्या सत्यभामा लोखंडे आणि बसपाचे संजय सोमकुंवर यांना अगदीच नाममात्र मते मिळाली. बसपाचे संजय सोमकुंवर यांना १९२८ मते मिळाले. तर वंचित बहुजन आघाडीच्या सत्यभागा लोखंडे यंना १८६७ मते मिळाली.