महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती म्हणून लढण्यासाठी भाजपानं मित्रपक्षांसाठी दारं उघडली आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर पक्षानं स्वबळावर लढावं अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वोच्च न्यायालयानं ६ मे रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यांच्या आत अधिसूचित कराव्यात आणि चार महिन्यांत त्या पार पाडाव्यात, असे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. निवडणुका वेळेत व्हाव्यात, अशी आमची इच्छा आहे. त्यात कोणतेही अडथळे येता कामा नयेत. काही विशिष्ट भागांत मुसळधार पावसामुळे समस्या उद्भवत असल्या तरी त्यासंबंधित मुदतवाढ मागता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ मे रोजी पुण्यात म्हटले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचा आग्रह असा होता की, भाजपा युतीसह निवडणुका लढवण्यासाठी वचनबद्ध आहे. मात्र, त्यांनी मित्रपक्षांसाठी वैयक्तिकरीत्या निवडणुका लढवण्याची दारंही उघड केली आहेत. “आम्हाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)सोबत युती करायची आहे. आम्हाला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे. असं असताना जर काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती यशस्वी झाली नाही, तर आम्ही एकमेकांविरुद्ध स्वतंत्रपणे निवडणूक लढविताना कोणतीही कटुता येणार नाही याची खात्री बाळगू. निवडणुकीनंतर जर अशी परिस्थिती उद्भवलीच, तर आम्ही पुन्हा एकत्र येऊन विरोधी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवू”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून एवढं तर स्पष्ट दिसत आहे की, काही महापालिकांमध्ये जागावाटप यशस्वी होणार नाही, असा पक्षाचा अंदाज आहे. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, मिरा-भाईंदर, अमरावती, अकोला, पनवेल, सांगली, उल्हासनगर, जळगाव व धुळे इथल्या पक्षांच्या घटकांकडून मिळालेला प्रतिसाद असा आहे की, पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. “जर काही कारणास्तव युती करणं आवश्यक असेल, तर आमचा फॉर्म्युला ५०:३०:२० असा असावा. अशा परिस्थितीत पक्ष अर्ध्या जागांवर, शिवसेना ३० टक्के व राष्ट्रवादी २० टक्के जागा लढवू इच्छित असल्याचे संकेत आहेत. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कारण- आमचा पक्ष १३७ आमदार आणि दीड कोटी सदस्यांसह सर्वांत मोठा पक्ष आहे”, असं एका भाजपा नेत्यानं म्हटलं आहे.

२०१५ ते २०१८ दरम्यान झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपानं २७ नागरी संस्थांमधील २,७३५ पैकी १,०९९ जागा जिंकल्या. त्यांचा मतदानाचा वाटा ३१.३ टक्के इतका होता. शिवसेना ४८९ जागा आणि १८.४९ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यानंतर काँग्रेस ४३९ जागा आणि १५.५३ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. राष्ट्रवादी काँग्रेस २९४ जागा आणि ११.०६ टक्के मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होती. उर्वरित जागा लहान पक्ष आणि अपक्षांकडे होत्या.

२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ८२ जागांसह भाजपा ८४ जागा असलेल्या अविभाजित शिवसेनेपेक्षा पिछाडीवर होती. त्यावेळी दोन्ही मित्रपक्ष होते. तरी त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या. आता शिवसेना विभाजित असल्याने भाजपाला खात्री आहे की, मुंबई महापालिकेसह बहुसंख्य महापालिकांमध्ये घवघवीत यश मिळू शकते. “आम्हाला निवडणुकीत युती टिकवून ठेवायची आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही वरिष्ठ पातळीवरून निर्णय लादू शकत नाही”, असे प्रदेश भाजपा अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. “तुम्हाला स्थानिक घटकांच्या आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावनांचाही विचार करावा लागेल. आमच्या स्थानिक घटकांकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे व गुणवत्तेनुसार सर्व घटकांचे मूल्यांकन करून राज्य आणि केंद्रातील आमचे वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील”, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

“निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष त्यांची खेळी कसे खेळतात हेदेखील पाहावं लागेल. सध्या आपल्याला माहीत आहे की, विरोधी पक्ष एकत्रित नाहीत आणि तेवढे मजबूतही नाहीत”, असंही भाजपाच्या एका सूत्रानं सांगितलं आहे. असं असूनही भाजपाचे रणनीतीकार आणि निवडणूक व्यवस्थापक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अति आत्मविश्वासाबाबद सावध आहेतच. या अति आत्मविश्वासामुळे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला धक्का बसला होता. पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक घटकांना सूचना दिल्या आहेत की, काही ठिकाणी एखाद्या मित्रपक्षाविरुद्ध लढण्याची वेळ आली तरी त्यात सभ्यता राखली गेली पाहिजे.

शिवसेनेची सद्य:स्थिती काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनादेखील स्वबळावर निवडणूक लढविण्यास तयार आहे. पक्षातील नेत्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे लक्ष त्या नागरी संस्थांवर असेल, जिथे विभाजनापूर्वी पक्ष कणखर परिस्थितीत होता. त्यांच्या मते, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी कमकुवत करण्यासाठी आणि गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाला बळकटी देण्यासाठी निवडक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खोलवर प्रवेश करणे हीच शिंदेंच्या सेनेची रणनीती असेल. शिंदे सेना लक्ष केंद्रित करणार असलेल्या भागांमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, मालेगाव व भिवंडी यांचा समावेश आहे. म्हणजेच कल्याण-डोंबिवली आणि छत्रपती संभाजीनगर इथेच सेना आणि भाजपामध्ये आमने-सामने होण्याची शक्यचा जास्त आहे. त्याशिवाय मुंबईतील प्रमुख लढत भाजपा आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात होईल. पक्षातील सूत्रांनी असेही सांगितले की, ते अजूनही राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राज ठाकरे यांनीही त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना युतींवर अवलंबून राहू नका. त्याऐवजी जमिनीवर राहून काम करा, असे सांगितले आहे. “कोणत्याही निवडणूकपूर्व युतींवर अवलंबून राहू नका. ते सर्व माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त तयारीला लागा”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. एकंदर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर तयारी तर सुरू झाली आहे. मात्र, कोण कोणविरुद्ध आणि कोण कोणासोबत लढणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.