मुंबई : लोकसभा निवडणुकीपासून मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करण्याचा कट आहे या आरोपांशिवाय मुंबईतील प्रचार पार पडत नाही. यंदा मात्र मुंबईतील प्रचारात धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न केंद्रस्थानी राहिला. मुंबईचा मुद्दा प्रत्येक प्रचारात अग्रस्थानी असतो. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मुंबईबद्दल त्यांनी केलेले विधान १९८५च्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला फायदेशीर ठरले होते. तेव्हा शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळाली होती. तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत मुंबईचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा मुद्दा मांडला असला तरी प्रचारात धारावी आणि अदानी हाच मुंबईतील प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरला. काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीवरून अदानी आणि भाजपला लक्ष्य केले होते.

महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव, मुंबईवर घाला घातला, तर हम तुम्हे काटेंगे, अदानी हे महाराष्ट्रावरील सुलतानी संकट, असे विरोधकांचे तोफगोळे, ‘व्होट जिहाद’ला प्रत्युत्तर देण्यासाठी ह्यमतांचे धर्मयुद्धह्ण करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन आणि बटेंगे तो कटेंगे व एक है तो सेफ है, असे धार्मिक ध्रुवीकरणासाठीचे भाजपचे नारे… अशा अनेक आरोप-प्रत्यारोप व नारेबाजीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गेले १२-१३ दिवस गदारोळ राहिला.

हेही वाचा : कालीचरण महाराजांच्या सभा आयोजनात संबंध नाही, वादग्रस्त वक्तव्यावर संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण, जरांगे यांचीही भेट

प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी मुंबईचा मुद्दा फारसा उपस्थित केला नव्हता, तरी अपेक्षेप्रमाणे समारोपाच्या सभेत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असा आरोप करीत तसे प्रयत्न झाल्यास हम तुम्हे काटेंगे असा इशाराही दिला. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मराठी अस्मिता, मराठी माणसाचा अपमान, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आदी मुद्दे ठाकरे यांनी नेहमीच उपस्थित केले होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ते पुन्हा मांडले गेले.

इशारे, आरोप-प्रत्यारोप

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास अदानींना दिलेले कंत्राट रद्द करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. मुंबई व महाराष्ट्र अदानींच्या घशात घालू देणार नाही, महाराष्ट्र हे अदानीराष्ट्र होऊ देणार नाही, असे इशारेही उद्धव व आदित्य ठाकरे यांनी दिले. मराठीला अभिजात दर्जा देण्याची घोषणा केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर केली. पण त्याचा प्रचार महायुतीने केला नाही.

हेही वाचा : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक : संयुक्त संसदीय समितीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता कमीच, कारण काय?

मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून तिचे मोदी-शहा तिचे महत्त्व कमी करीत आहेत, महाराष्ट्रातून गुजरातला उद्याोग पळविले जात आहेत, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला नेण्यात आले, आदी आरोप-प्रत्यारोप पुन्हा चांगलेच गाजले. महाराष्ट्रातील उद्याोग गुजरात व अन्य राज्यात नेण्यात येत असल्याने लाखो तरुणांचे रोजगार बुडाले, असा प्रचारही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व ठाकरेंकडून करण्यात आला. मनसेकडूनही स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

धार्मिक ध्रुवीकरणावर भर

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत प्रत्येक निवडणुकीत उभयपक्षी वेगवेगळ्या मार्गांनी जाणीवपूर्वक पुढे येतात. लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसल्याने फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘बटेंगे, तो कटेंगे’ आणि ‘एक है, तो सेफ है’चे नारे दिले. महायुतीची सत्ता आणायची असेल, तर ‘व्होट जिहाद’ला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

भाजप नेत्यांनी हिंदू मते संघटित करण्याच्या दृष्टीने प्रचाराची रणनीती आखली होती. मुंबई, ठाणे व महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातही अनेक मतदारसंघांमध्ये धार्मिक ध्रुवीकरणावर विजयाचे गणित निश्चित होणार असल्याने भाजपने अधिक प्रखरपणे त्यावर भर दिला होता. उलेमांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केलेल्या १७ मागण्या व त्यांनी त्यास दिलेली संमती, नोमानी या मुस्लीम धर्मगुरूंनी एक प्रकारे केलेले जिहादचे आवाहन आदी बाबींनी धार्मिक मुद्द्यांवर प्रचारात राळ उडविली.

हेही वाचा : स्वतःचं घर, गाडी नाही; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला राज्यात जिवंत ठेवणारे एकमेव आमदार आहेत तरी कोण?

मलिक विरोध फुसका?

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) फडणवीस यांचा विरोध डावलून नवाब मलिकांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. मलिक हे वैद्याकीय जामिनावर असताना निवडणूक लढवीत असून प्रचारात आहेत, हा मुद्दा उच्च न्यायालयात गेला आहे. अन्य वेळी तत्परतेने कारवाई करणाऱ्या ईडीने मात्र स्वत:हून मलिक यांचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पाऊल उचलले नसल्याने आणि फडणवीस यांना विरोध डावलून उमेदवारी देणे शक्य आहे का, हे पाहता भाजपचा मलिक यांना असलेला विरोध फुसकाच असल्याची चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित ठाकरे यांच्याविषयी उत्सुकता

वरळीत आदित्य ठाकरे यांच्या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे माहीममधून निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार सदा सरवणकर यांनी माघार न घेतल्याने राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील संबंध ताणले गेले. पण ठाकरे घराण्यातील आणखी एक व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरल्याने त्यांना जनमताचा कौल मिळणार का, याविषयी राज्यात सर्वांनाच उत्सुकता आहे.