अतिशय बारकाईने केलेले नियोजन, रणनीतीला चिकटून राहून प्रदेशनिहाय केलेला प्रचार, भारतीय जनता पक्षाशी संबंधित संस्था-संघटनांनी सक्रिय राहून घराघरांत पोहोचवलेली महायुतीची भूमिका आणि ‘लाडकी बहीण’ योजना महायुतीला पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत यश देऊन गेली. दुसरीकडे या तीन जिल्ह्यांत काँग्रेसची दारुण पीछेहाट झाली असून, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांचे यश फारच मर्यादित आहे. तिन्ही जिल्ह्यांतील एकूण ४४ जागांपैकी ३३ महायुती, ९ महाविकास आघाडीला, १ शेकापला, तर १ अपक्षाला मिळाली.

सभांचे नियोजन, केंद्रीय नेतृत्वाने शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका टाळणे, काँग्रेसला लक्ष्य करणे याबाबतचे महायुतीचे नियोजनही वैशिष्ट्यपूर्ण ठरले. ‘बटेंगे तो कटेंगे’चे रचित (नॅरेटिव्ह) नेत्यांच्या भाषणात येईल, मैदानावरील प्रचारात स्थानिक मुद्देच प्राधान्यक्रमात वर राहतील, याची काळजी घेतलेली दिसली. शिवाय, प्रदेशांच्या जबाबदाऱ्याही नियोजनपूर्वक वाटल्याचे दिसले. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये फडणवीस आणि अजित पवार यांनी लक्ष घातले, त्यातही दोन्ही शहरांतील कोणत्या मतदारसंघात कोणी जास्त लक्ष घालायचे, हेही ठरवून घेतले गेले होते. तर, अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे यांनी जवळपास एकहाती प्रचारधुरा सांभाळून कुठेही दगाफटका होणार नाही, याची दक्षता घेतली. ‘एक है तो सेफ है’चा नारा पुणे आणि अहिल्यानगरमध्ये चालल्याचेही स्पष्ट दिसते. त्याला भाजप परिवारातील संघटनांच्या दारोदारी केलेल्या प्रचाराने हातभारच लागला. या प्रचारात ‘राष्ट्रहितासाठी मतदान करा,’ असा संदेश देताना ‘धर्म’ थेट नसला, तरी अप्रत्यक्ष होताच. मतदानाचा वाढलेला टक्काही याच प्रयत्नांचे फळ होते, ज्याचा महायुतीला चांगला फायदा झाल्याचे दिसते. पुण्यात यंदा निकाल वाढला, हे चांगले लक्षण. त्यात वडगाव शेरीमध्ये पोर्श अपघातप्रकरणी नाव आलेल्या आमदाराला नाकारून महायुतीच्या इतर उमेदवारांच्या पारड्यात मात्र भरभरून मते पडली आहेत, हे वैशिष्ट्यपूर्ण. पुणे जिल्ह्यात अजित पवारच दादा असतील, असे जिल्ह्याचा निकाल सांगत असला, तरी त्यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही नजर राहील, असे दिसते. त्यांच्याकडे या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी होती आणि त्यांनी त्यात यश मिळवले आहे. ग्रामीण भागात ‘दादा’ असले, तरी पुणे शहराला हवे असलेले नेतृत्व मोहोळ यांच्याकडे येते का, हेसुद्धा यानिमित्ताने ठरणार आहे.

हेही वाचा : सेनापतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी १० जागा महायुतीने खेचल्या. या विजयात राधाकृष्ण विखे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. ते स्वत: तर निवडून आलेच, शिवाय राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांना आपल्याच मर्जीतील उमेदवार द्यायला लावून एक प्रकारे दगाफटका टाळला. बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे आणि खासदार नीलेश लंकेंची पत्नी राणी यांचे पराभव महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागणारे ठरले, तर रोहित पवार काठावर उत्तीर्ण झाले. धार्मिक मतविभागणीही या पराभवांना कारणीभूत ठरली, म्हणजेच येथेही ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’चे कथानक चालताना दिसले. नगरमध्ये काँग्रेसची एक जागा निवडून आली. जिल्ह्यावर इथून पुढच्या काळात विखे यांचे महत्त्व वाढेल, असा या निकालाचा सांगावा आहे.

हेही वाचा : पवार जिंकले… पवार हरले !

सोलापूर जिल्ह्यात पाच जागा जिंकण्यात भाजपला यश आले आहे, ज्याचे कारण पुन्हा नियोजनबद्ध प्रचारातच आढळते. माळशिरसची जागा मोहिते-पाटील घराण्याने प्रतिष्ठित केली होती. पण, तरी तेथून उत्तमराव जानकरांना निवडून आणताना मोठे कष्ट पडल्याचे मतदानातून सरळसरळ दिसते. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने जिंकलेल्या चारही जागांत मोहिते-पाटील आणि शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरल्याचे दिसते. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील अनबनी सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला अडचणीची ठरली. याचा परिणाम काँग्रेस हद्दपार होण्यात झाला आहे. सांगोल्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाविरुद्ध निवडून आलेला शेकापचा उमेदवार महायुतीकडे जाईल, अशी चर्चा आहे. येथे महायुतीचे शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहाजीबापू पाटील हरले, हा महायुतीसाठी बसलेला धक्का त्यामुळे निवळणार, असे दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

siddharth.kelkar@expressindia.com