नाशिक : मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तीन ते सात टक्क्यांनी मतदान वाढले असून या वाढीव मतटक्क्यात प्रामुख्याने लक्ष्मीदर्शन, धार्मिक विषय, धनगर-आदिवासी आरक्षण वाद आणि महिला मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याचे दिसून आले.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने लोकसभा निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या या प्रश्नाची धग नाशिक जिल्ह्यात या वेळी काहीशी कमी झालेली जाणवली. लाडकी बहीण योजना आणि लक्ष्मीदर्शनाचा प्रभाव यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे म्हटले जात आहे. २०१९ च्या तुलनेत महिलांच्या मतदानात ८.९२ टक्क्यांनी झालेली वाढ बरेच काही सांगून जाते. पुरुषांच्या मतांमध्येही ३.२५ टक्क्यांनी वाढ झाली. नाशिक जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढण्यात उमेदवारांची संख्या वाढल्याने निर्माण झालेली चुरसही कारणीभूत ठरली.

हेही वाचा : काँग्रेसकडून आमदारांसाठी विशेष विमान, दगाफटका होऊ नये म्हणून आधीच खबरदारी

बहुतेक मतदारसंघांमध्ये दुपारपर्यंत मतदानाचा ओघ कमी होता; परंतु शेवटच्या दोन तासांत अचानक लोंढेच्या लोंढो मतदार केंद्रांवर धडकले. त्यामागे लक्ष्मीदर्शन हे कारण असल्याचे मानले जाते. त्यामुळेच काही ठिकाणी रात्री नऊपर्यंत मतदान चालले. याचे उदाहरण द्यायचे तर नांदगाव मतदारसंघात दुपारी एकपर्यंत अवघे ३० टक्के मतदान होते. त्यानंतर ४० टक्क्यांनी मतदान वाढले. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातच मराठा नेते मनोज जरांगे यांचा प्रभाव जाणवला.

धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचा विषय नंदुरबार जिल्ह्यात अधिक गाजला. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदानात वाढ होण्यामागील हे एक कारण मानले जाते.

हेही वाचा : मतदानाचे मुद्दे : पश्चिम महाराष्ट्र; मराठा आंदोलन, हिंदुत्व आणि संविधानचाही प्रभाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत ५६.६१ टक्के मतदान झाले होते, तर विधानसभेला ही टक्केवारी ६४.७० पर्यंत पोहोचली. लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेला प्रचार आणि धार्मिकतेमुळे झालेले धुव्रीकरण ही दोन कारणे जिल्ह्यातील मतटक्का वाढण्यासाठी दिली जात आहेत.