महायुती सरकारच्या स्थापनेच्या वेळी मंत्रिपद नाकारल्याने नाराज झालेल्या छगन भुजबळांनी थेट पक्षाध्यक्ष अजित पवारांवरच आरोप केले होते. नेतृत्वाला आव्हान देत वेगळी भूमिका मांडली होती. तेच भुजबळ आता उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरले आहेत. भुजबळांच्या समावेशामागे राष्ट्रवादीपेक्षा भाजपची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वााखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे भुजबळ संतप्त झाले होते. त्यांनी थेट अजित पवारांनाच लक्ष्य केले. ‘आपला मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. त्याआधी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा अजित पवारांच्या पत्नीला संधी देण्यात आली. नंतरही मला डावलण्यात आले. मी काही यांच्या हातचे खेळणे नाही’ अशा शब्दांत भुजबळांनी आपल्या संतापाला वाट करून दिली होती. नंतर पक्षातही भुजबळ फारसे सक्रिय नव्हते. दर मंगळवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक अजित पवारांच्या निवासस्थानी होती. त्यालाही भुजबळ गेले दोन महिने फिरकत नसत. त्याच वेळी भुजबळांच्या फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वाढल्या होत्या.

भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही भुजबळ पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहात नसत. याउलट ते फडणवीस यांना नेहमी भेट असत. अजित पवार आणि भुजबळांमधील दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते.

अजित पवरांनाच लक्ष्य करणाऱ्या भुजबळांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश झाला. भुजबळांना पुन्हा मंत्रिपद हे मुख्यमंत्री फडणवीस की अजित पवारांमुळे मिळाले याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीकडे प्रभावी ओबीसी चेहरा नव्हता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीसाठी ओबीसी मते महत्त्वाची आहेत. केवळ मराठा समाजाचा पक्ष म्हणून प्रतिमा तयार होऊ नये अशी खबरदारी अजित पवार घेत असतात. यामुळे जरांगे यांच्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या वातावरणात फडणवीस व अजित पवारांनी तेव्हा भुजबलांना मुक्तवाव दिला होता. ओबीसी मतांसाठी भुजबळांचे मंत्रिपद महायुतीलाही फायदेशीर ठरणारे आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊनच भुजबळांचा समावेश झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छगन भुजबळ यांच्या समावेशामुळे राष्ट्रवादीला ओबीसी समाजाचे पाठबळ लाभू शकते. एकत्रित राष्ट्रवादीवर मराठा समाजाचा पक्ष म्हणून शिक्का बसला होता. हा शिक्का पुसून काढण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न अजित पवारांचा असतो. सर्वसमावेशक पक्ष म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असतो. यातूनच भाजपच्या काही नेत्यांनी मुस्लीम समाजाच्या विरोधात विधाने करताच अजित पवारांनी त्याला विरोध केला होता. भुजबळांना मंत्रिपद दिल्याने ओबीसी समाजात पक्षाला चांगला संदेश जाईल, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांना विश्वास वाटतो.