नगर : पदवीधर निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीच्या आमदारांची दांडी | MLA of Maha Vikas Aghadi are not participating in Nashik graduate election campaign | Loksatta

नगर : पदवीधर निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीच्या आमदारांची दांडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात ६ आमदार आहेत. मात्र त्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. शिवसेना पुरस्कृत माजीमंत्री आ. शंकरराव गडाख हेही अनुपस्थितीत होते.

MLA , Maha Vikas Aghadi, participating, Nashik graduate election campaign
नगर : पदवीधर निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीच्या आमदारांची दांडी

मोहनीराज लहाडे

नगरः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये प्रथमच महाविकास आघाडीची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली, मात्र या बैठकीकडे आघाडीच्या जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी पाठ फिरवली. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा पहिलाच जिल्हा दौरा होता. मात्र पक्षाचे लोकप्रतिनिधी व थोरात गटाचे बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्यासह त्यांचे वडील व मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे या दोघांना पक्षाने निलंबित केले. तांबे यांना पाठिंबा देणारे काँग्रेसचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनीही पदाचा राजीनामा दिला. आ. थोरात मुंबईत रुग्णालयात असल्याने त्यांची अनुपस्थिती अशा विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांचा पहिलाच जिल्हा दौरा महत्वपूर्ण होता. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आ. पटोले प्रथमच नगरमध्ये येत होते.

हेही वाचा… भाजपाच्या पडळकरांना शिंदे गटाच्या आमदाराने सुनावले

महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी यापूर्वी जिल्ह्यात येऊन महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र महाविकास आघाडी म्हणून यांच्या प्रचारासाठी पहिलीच एकत्रित बैठक आज, शुक्रवारी नगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटना पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहिले. प्रदेशाध्यक्ष येणार म्हणून काँग्रेसचेही शहरातील तसेच जिल्ह्यातील काही पदाधिकारी उपस्थित होते. मात्र थोरात गटाच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

तांबे यांच्यावर प्रदेशाध्यक्षांनी केलेली निलंबनाची कारवाई, ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्याने निर्माण झालेली दुफळी, यामुळे आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामागे काँग्रेस एकसंघपणे उभी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न थोरात गटाच्या अनुपस्थितीमुळे अयशस्वी ठरला.

हेही वाचा… पंढरपूर वगळता पोटनिवडणुकांत महाविकास आघाडीचाच वरचष्मा

राष्ट्रवादीचे शहरातील आमदार संग्राम जगताप आज नगरमध्येच होते, मात्र त्यांच्यासह राष्ट्रवादीचे शहरातील पदाधिकारी व नगरसेवकही बैठकीस अनुपस्थित होते. आ. थोरात वगळता काँग्रेसचे जिल्ह्यात लहू कानडे हे आणखी आमदार आहेत, मात्र तेही अनुपस्थित होते. आ. कानडे हे थोरात समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात ६ आमदार आहेत. मात्र त्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. शिवसेना पुरस्कृत माजीमंत्री आ. शंकरराव गडाख हेही अनुपस्थितीत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे व शहरप्रमुख संभाजी कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा… नागपूरमध्ये तिरंगी लढतीत भाजपापुढे कडवे आव्हान; फडणवीस, गडकरी, बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला

ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार किरण काळे यांच्याकडे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना समर्थन देणारे काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे तर दुसरीकडे त्यांना निलंबित करण्यात आल्याचे प्रदेश काँग्रेसने जाहीर केले आहे. तसेच ग्रामीण जिल्ह्याची कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण जिल्हाध्यक्षाचा प्रभारी कार्यभार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी जाहीर केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 19:57 IST
Next Story
“माझ्यामुळेच सत्ता आली”, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या आधी अशोक गेहलोत – सचिन पायलट यांच्यात पुन्हा धुसफुस