राज्यसभेसाठी झालेल्या मतदानादरम्यान विदर्भातील अपक्षांनी कोणाच्या बाजूने मतदान केले यावरून संशयकल्लोळ निर्माण झाला असतानाच आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही त्यांची मते महत्त्वाची ठरणार असल्याने ते कोणती भूमिका घेतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः विदर्भातील असल्याने त्यांची विशेष जादू चालणार का? याचीही उत्सुकता आहे.

विदर्भात देवेंद्र भुयार (मोर्शी), आशीष जयस्वाल (रामटेक), विनोद अग्रवाल (गोंदिया), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), रवी राणा (बडनेरा) आदी अपक्ष आमदार आहेत. यापैकी आशीष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर यांचा शिवसेनेला पाठिंबा आहे. विनोद अग्रवाल व रवी राणा भाजपच्या गटात तर देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादीसोबत आहेत. किशोर जोरगेवार यांची भूमिका अस्पष्ट आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची मते फुटल्याचा आरोप चांगलाच गाजत आहे. देवेंद्र भुयार यांच्यावर तर सेनेने थेट आरोप केला आहे. महाविकास आघाडीतील राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही भुयार यांच्याबाबत संशय व्यक्त केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनीही त्यांना पक्षाने ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा एक मत अधिक मिळाल्याचा दावा केला. ते मत कोणाचे याबाबत चर्चा आहे. राष्ट्रवाादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे मत भाजपच्या कोट्यातील असल्याचे संकेत दिले. याचे धागेदोरेही पूर्व विदर्भाशी जोडले जात आहेत.

राज्यसभा जिंकूनही कोल्हापुरात भाजपसमोर आव्हानांची मालिका

गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी व अग्रवाल गट अशी युती झाली होती. पटेल यांना मिळालेल्या अतिरिक्त मताशी याचा काही संबंध तर नाही ना? असा तर्क आता लावला जात आहे. जोरगेवार यांचे मत कोणाच्या पारड्यात गेले हे स्पष्ट झालेले नाही. त्यांच्याविषयी काँग्रेसच्या गोटातून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. आशीष जयस्वाल यांनी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर निधी वाटपावरून आरोप केले होते. फक्त नरेंद्र भोंडेकर यांचे नाव कुठल्याच वादात नाही.

तडजोडीच्या राजकारणावरुन भाजप आक्रमकतेकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूणच राज्यसभेच्या निवडणुकीतील संशयकल्लोळ बघता आता विधान परिषद निवडणुका होत आहेत. त्यात भाजप व काँग्रेसला अपक्षांची मदत लागणार आहे. सेनेकडून आरोप झाल्याने भुयार यांनी नाराजी व्यक्त केली. तर ‘घोडेबाजार’ या शब्दप्रयोगावर जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत विदर्भातील अपक्ष आमदार कोणती भूमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.