महेश बोकडे
नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनात गेल्या तीन दिवसांपासून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी नेत्यांकडून परस्परांचे घोटाळे बाहेर काढण्याच्या नावावर बाॅम्ब फोडण्याचे इशारे दिले जात आहे. त्यामुळे अधिवेशन काळात बॉम्बच्या नावावर बोंबाबोंब सुरू आहे.
सर्व प्रथम शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी २५ डिसेंबरला नागपुरात येण्यापूर्वी सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून बाॅम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षाचे बॉम्ब लवंगी फटाके देखील नाहीत. आमच्याजवळही भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू. पण आता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत, ते बघू, असे सांगितले होते.
त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, गेल्या तीन दिवसांत मंत्र्यांच्या घोटाळ्याची दोन प्रकरणे काढली, ते काय लवंगी फटाके आहेत का? देवेंद्र फडणवीसांनी किमान राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे. संपूर्ण सरकार अडचणीत आहे. एक- दोन मंत्री नाही. जे शिवसेनेतून फुटून बाहेर गेले आहेत, त्या प्रत्येकाचा बॉम्ब किंवा लवंगी फटाका फुटत राहणार आहे. बाॅम्बच्या विषयावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मी कधीही बाॅम्ब संदर्भात बोललो नाही. त्यामुळे ज्यांनी हे म्हटले त्यांना विचारा म्हणत संजय राऊत यांच्याकडे बोट दाखवले.
हेही वाचा: भाजप अध्यक्ष सोमवारी औरंगाबादेत, लोकसभेची तयारी सुरू
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खोचक शब्दांत टोला लगावत सांगितले की, संजय राऊत यांच्या फटाक्याने कुत्रंही पळू शकत नाही. आम्ही तर वाघ आहोत. त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त त्या पेटवण्याचा अवकाश आहे.
हेही वाचा: अमित साटम : व्यवस्थापन क्षेत्राकडून राजकारणाकडे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) हरित क्षेत्राला- निवासी क्षेत्रात परिवर्तीत केल्याची यादी काढली तर त्यात अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे पितळ उघडे पडेल. हा बाॅम्ब नव्हे तर अणुबाॅम्ब आहे.