नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीत राजकीय चित्र पालटले आहे. काँग्रेसकडून अशोक चव्हाण विरुद्ध इतर सारे ही २५ वर्षांची मालिका अचानक खंडित झाली. सहा महिने आधी काँग्रेस पक्षासाठी भक्कम तयारी करणारे चव्हाण निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून भाजपात गेले, या पक्षातर्फे राज्यसभा खासदार झाले आणि आता मागील निवडणुकीत ज्यांनी त्यांचा पराभव केला, त्या प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा निवडून आणण्याची आव्हानात्मक जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.

१९९६ पासूनच्या निवडणुकांचा इतिहास पाहता नांदेडमध्ये प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी सरळ लढत झाली, तरी बहुतांश निवडणुकांत मतदारांसमोर तिसरा पर्याय म्हणून शरद जोशी, महादेव जानकर या दिग्गजांशिवाय काही स्थानिक उमेदवार उभे राहिले; पण ‘सामना’ दोन मोठ्या पक्षांतच झाला. आताच्या निवडणुकीत प्रभावशाली राहिलेले चव्हाण पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेसने जुन्या राजकीय घराण्यातील माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना उभे करण्याचे जाहीर केले तेव्हा राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या. पण अल्पावधीत सामान्य कार्यकर्ते आणि ठिकठिकाणच्या हितचिंतकांच्या पाठबळावर त्यांनी भाजपाच्या बलाढ्य फौजेसमोर आव्हान निर्माण केले आहे.

हेही वाचा : “मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?

मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या उमेदवाराचा फटका काँग्रेसला बसला होता. आताही या आघाडीने अविनाश भोसीकर या कार्यकर्त्यास उभे केले असले, तरी पाच वर्षांपूर्वी जी आस्था, जी सहानुभूती वंचित घटकांमध्ये ठळकपणे दिसत होती, ती या निवडणुकीत दिसत नसल्यामुळे यंदा दोन मराठा पाटील परिवारातल्या उमेदवारांमध्ये लढत रंगत चालली असून त्यात अशोक चव्हाण यांच्या राजकीय करिष्मयाची, त्यांच्या प्रभावाची आणि नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

गेल्या अनेक लोकसभा निवडणुकांत विरोधी नेत्यांनी नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण, भास्करराव खतगावकर आणि अशोक चव्हाण यांना ‘लक्ष्य’ करत प्रचारात आरोपांची राळ उडवून दिली. आता चव्हाण-खतगावकरच भाजपाच्या प्रचाराची आघाडी सांभाळत असल्यामुळे भाजपाला काँग्रेस पक्षाचा उमेदवार किंवा नेतृत्वावर टीका करण्यासाठी ठोस विषयच उरलेला नाही.

हेही वाचा : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?

वसंत चव्हाण-चिखलीकर यांच्यातील लढत निश्चित झाली तेव्हा शहरी भागात भाजपासाठी एकतर्फी लढत असा सूर निघाला. अशोक चव्हाण व त्यांच्या समर्थकांच्या भाजपा प्रवेशामुळे या पक्षाच्या उमेदवाराची स्थिती भक्कम झाल्याचे मानले जात होते, पण ग्रामीण भागातून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मराठा आरक्षण, शेतकर्यांच्या शेतीमालाचे भाव, साखर कारखानदारांचा कारभार, पायाभूत सोयीसुविधा, विद्यमान खासदारांची निष्क्रियता आदी वेगवेगळ्या मुद्यांवर सत्ताधार्यांबद्दलचा रोष ठिकठिकाणी बघायला मिळाला.

आपली राजकीय सोय पाहून अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयावरची तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या भोकर मतदारसंघ ह्या प्रभावक्षेत्रातून व्यक्त झाली. तिचे लोण अन्यत्रही पसरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेला मोठी गर्दी झाली; पण त्यानंतरच्या दहा दिवसांत आश्वासक वातावरण निर्मिती झाली नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निर्णायक परिणाम आणि अयोध्येतील राम मंदिर हेच भाजपासाठी मोठे आधार आहेत.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? महाराष्ट्रातील जनतेच्या काय आहेत भावना?

ग्रामीण लोकांच्या मनात जी खदखद आहे, ती हेरून काँग्रेसने आपला प्रचार जारी ठेवला. ‘चारसौ पार’ ह्या भाजपाच्या नाऱ्यावर ग्रामीण भागात नकारात्मक प्रतिक्रिया आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘पाच न्याय’ लोकांसमोर मांडले जात आहेत. मोदी सरकारच्या १० वर्षांच्या राजवटीत नांदेडला एकही मोठी योजना किंवा प्रकल्प आला नाही. अशोक चव्हाण यांनी मागील काही महिन्यांंपर्यंत मराठा आरक्षणाच्या विषयात भाजपावर दोषारोप ठेवला; पण आता भाजपात गेल्यानंतर ते याच विषयावर शिंदे-फडणवीस यांचे गुणगान करत असल्यामुळे ग्रामीण भागात चव्हाणांसह भाजपावर रोष दिसत आहे.

नांदेडमध्ये १९८९च्या निवडणुकीत तेव्हा भक्कम असलेल्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी जबर तडाखा दिला होता. आता काँग्रेसच्या जागी भाजपा असून लोकभावना १९८९ सारखी दिसत असल्यामुळे ही जागा राखण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर उभे राहिले आहे.

हेही वाचा : इंडिया आघाडी जिंकली तर नेतृत्व कोण करणार? मल्लिकार्जुन खरगेंनी केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचा इतिहास

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर नांदेडमध्ये झालेल्या १६ निवडणुकांपैकी चार निवडणुकांत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला, तरी कोणत्याही दोन सलग निवडणुकांत हा पक्ष हरला नाही किंवा काँग्रेस विरोधात निवडून आलेला उमेदवार पहिल्या यशानंतर पुन्हा खासदार झाला नाही. २०१९ साली काँग्रेसचा पराभव झाला; पण आता आमच्या विजयाची ‘बारी’ असल्याचे या पक्षातर्फे ठासून सांगितले जात असून ‘मतदारांची पसंत, चव्हाण वसंत’ असा नारा देण्यात येत आहे.