सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सक्रिय कार्यकर्ते निर्माण करण्याच्या प्रक्रियेत पक्ष निरीक्षक म्हणून अमरसिंह पंडीत यांनी अधिक लक्ष घालावे असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी त्यांना कानपिचक्या दिल्या. तुम्हाला काय लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवायची आहे काय, असा प्रश्न अमरसिंह पंडित यांना करत पक्ष निरीक्षक असल्याने प्रत्येक तालुक्यात जाऊन जरा झाडाझडती घ्या.. सक्रिय सभासदांची संख्या वाढवा असेही ते म्हणाले. असे करताना शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारीच सदस्य म्हणून नोंदवू नका तर प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची संख्या वाढवा, अशा सूचनाही त्यांनी सोमवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिल्या. आमदार सतीश चव्हाण यांनाही त्यांनी दौरे वाढविण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा… आंध्रप्रदेश अजूनही राजधानीच्या प्रतीक्षेत, सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

औरंगाबाद येथील सक्रिय सभासद नोंदणीचा आढावा घेताना कोणी किती सदस्यता नोंदणी पुस्तिका नेल्या आणि त्यातील किती जणांनी त्याचा हिशेब दिला, याची माहिती पाटील यांनी आढावा बैठकीत घेतली. सिल्लोड मतदारसंघात जरा अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्याही सूचना त्यांनी तालुकाध्यक्षांना दिल्या. ‘औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये यश मिळाले नाही. २०१४ मध्ये तर लाटच होती. त्यानंतर निवडणुकामध्ये अपयश आले. मात्र, आता संघटितपणे नियोजन करुन काम करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सुरू असणाऱ्या संघटनात्मक कामात कमालीचा संथपणा असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम वाढविण्यासाठी आमदार सतीश चव्हाण आणि पक्ष निरीक्षक अमरसिंह पंडित यांनी दौरे वाढवावेत. तसेच निरीक्षक अमरसिंह पंडित यांना या अनुषंगाने जास्त अधिकार असल्याने त्यांनीच या कामात पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सुचविले. प्रत्येक मतदारसंघात सक्रिय कार्यकर्ते वाढविले तरच पक्ष वाढेल. त्यासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले. त्यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देत आता सक्रिय कार्यकर्ते वाढवा अशा सूचना दिल्या. सतीश चव्हाण यांनीही सक्रिय कार्यकर्ते करताना केवळ संस्थेतील कर्मचाऱ्यांची नावे टाकू नयेत असा टोमणाही यावेळी मारला.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी करायची किंवा नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करुन घ्यावा असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी सांगितले. जिथे ज्याची अधिक ताकद तिथे तो पक्ष काम करेलच. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद येथे सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्याच्या कामास गती देण्यासाठी सोमवारी आढावा बैठक घेतली.

हेही वाचा… धुळ्यात शिवसेना-शिंदे गट यांच्यातील संघर्षाला विधायक वळण, शासकीय रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम

ज्या प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकास कामांच्या घोषणा करू लागले आहेत. त्यावरुन राज्यात केवळ ४० मतदारसंघाचाच विकास होईल. महाराष्ट्र राज्य म्हणून काही पुढे जाणार नाही. त्यामुळे २८८ मतदारसंघाचा विकास होणार नाही. ज्या प्रकारे सध्या कामकाज सुरू आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीही खूश नसतील. त्यांचा स्वभाव मला अधिक माहीत आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp state president jayant patil criticized party leader over membership issue print politics news asj
First published on: 20-09-2022 at 10:28 IST