परभणी : जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी ११७ तर नगरसेवक पदासाठी १२१० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कुठे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात भारतीय जनता पक्ष तर कुठे महायुतीतले तीनही पक्ष समोरासमोर, कुठे महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्येच संघर्ष ! कुठे महायुतीतल्या घटक पक्षासोबत महाविकास आघाडीतल्या एखाद्या पक्षाचे संगनमत अशा विचित्र प्रकारामुळे ‘ना महायुती ना महाविकास आघाडी, स्थानिक पातळीवर सोयीनुसार तडजोडी’ असा प्रकार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे एकत्रितपणे निवडणूक लढवणार नाहीत हेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. जिंतूर, मानवत व गंगाखेड या तीन पालिकेत भारतीय जनता पक्ष व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने समोरासमोर दंड थोपटले आहेत. मानवत पालिकेत भाजप व शिंदे गट सोबत असला तरी या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात या दोन पक्षांनी एकत्र मोट बांधली आहे.

सोनपेठ पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने शहर विकास परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. माजी आमदार व्यंकटराव कदम हे त्याचे नेतृत्व करीत आहेत. गंगाखेड पालिकेत आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विरोधात भारतीय जनता पक्षाचे पॅनल व नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे आहेत. रासप व भाजप हे मित्रपक्ष असले तरी गंगाखेडला परस्परांचे विरोधक आहेत. गंगाखेड पालिकेत भाजपच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात आहे.

पूर्णा पालिकेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाकडून कमलताई जनार्धन कापसे तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रेमला संतोष एकलारे, काँग्रेसकडून हसीना बेगम मोहम्मद लतीफ, विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाकडून विमलताई लक्ष्मणराव कदम, वंचित बहुजन आघाडीकडून आम्रपाली केशव जोंधळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पूर्णा येथे बहुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. सेलू पालिकेत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी जोडीला महाविकास आघाडी असे विचित्र समीकरण निर्माण झाले आहे.

मानवत येथे माजी नगराध्यक्ष अंकुश लाड यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. विद्यमान आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लढत दिली जात असली तरी समोर मात्र शिवसेना एकनाथ शिंदे गट व भारतीय जनता पक्ष राजकीय विरोधक म्हणून आहेत. जिंतूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून साबिया बेगम कपील फारुखी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिवसेना शिंदे गटाकडून राजेश वट्टमवार यांनी अर्ज दाखल केला.

जिंतूरला महायुतीतले तीनही प्रमुख पक्ष नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्रपणे रिंगणात आहेत. सोनपेठ येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी तर शहर विकास परिवर्तन आघाडीमार्फत परमेश्‍वर कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पाथरी नगरपालिकेत अध्यक्षपदासाठी काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे शिवसेना अशी तिरंगी लढत आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात आमदार राजेश विटेकर, सईद खान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व शिंदे सेनेचे स्वतंत्र पॅनल उभे आहे. इथेही महायुतीतले दोन पक्ष समोरासमोर आहेत.

परभणी विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये त्या त्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत त्यामुळे परभणी महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजकीय अस्तित्व पणाला लागेल पण जिल्ह्यातल्या अन्य तीन विधानसभा मतदारसंघातल्या सात पालिकांमध्ये मात्र या पक्षाची कामगिरी फारशी प्रभावी नाही हे दिसून येत आहे. या निवडणुकीत पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, पाथरीचे आमदार राजेश विटेकर या तिघांची प्रतिष्ठा अवलंबून आहे. आपापल्या कार्यक्षेत्रातल्या पालिका निवडणुका जिंकण्यासाठी या आमदारांनी राजकीय ताकद पणाला लावली आहे.