छत्रपती संभाजीनगर – फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असून, जनसंघाच्या काळापासून येथे वर्चस्व राहिलेले आहे. यावेळी भाजपकडून मतदारसंघात प्रथमच अनुराधा चव्हाण या महिला उमेदवाराला संधी देण्यात आली असून, त्यांची येथे काँग्रेसचे विलास औताडेंसोबत प्रमुख लढत होत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे रमेश पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने भाजपपुढे आव्हान उभे राहिले आहे.

मतदारसंघाच्या पुनर्रचनेपूर्वी फुलंब्री हा औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचा एक भाग होता. पुढे स्वतंत्र फुलंब्री मतदारसंघ निर्माण झाला. हा मतदारसंघ औरंगाबाद शहरातील दहा वाॅर्ड, तालुक्यातील अनेक गावे, फुलंब्री शहर आणि तालुका, सिल्लोड व खुलताबाद तालुक्यातील अनुक्रमे ४२ व सहा गावे, कन्नडमधीलही काही गावे, असा संमिश्र आहे. यामध्ये ३ लाख ७० हजार एकूण मतदार आहेत.

फुलंब्री मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघाशी जोडलेला आहे. जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी पाच वेळेस प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी त्यांचा काँग्रेसचे डाॅ. कल्याण यांनी पराभव केला. जालन्याचे खासदार तथा आैरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांचे मूळ गावही फुलंब्री मतदारसंघात येते. डाॅ. कल्याण काळे फुलंब्री मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले असून, तेवढा दहा वर्षांचा अपवाद वगळता या मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. जनसंघाच्या काळातील रामभाऊ गावंडे यांनी येथून प्रतिनिधीत्व केले. त्यांच्यानंतर हरिभाऊ बागडे हे तीस वर्षे आमदार राहिलेले आहेत. अलिकडेच बागडे हे राजस्थानचे राज्यपाल झाल्यानंतर येथून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालवले होते. मात्र, भाजपने यावेळी अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे पती अतुल चव्हाण हे प्रशासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी असून त्यांचे माहेर विदर्भातून येते.

हेही वाचा >>>वणीत भाजपमागे शुक्लकाष्ठ, कुणबी वक्तव्यानंतरचे बॅग तपासणी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विलास औताडे हे काँग्रेसचे उमेदवार असून, त्यांचे वडील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत. शहराजवळील अनेक गावांमध्ये औताडे यांचे नातेसंबंध आहेत. लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड लाख मते घेणारे सरपंच मंगेश साबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार म्हणून मान्यता मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, जरांगे पाटील यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर साबळे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यांची उमेदवारी कायम असली तरी त्यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. हरिभाऊ बागडे यांनी बांधलेल्या या मतदारसंघात कॉग्रेसचे आव्हान असले तरी नव्याने अनुराधा चव्हाण यांच्या पाठिशी भाजपचे कार्यकर्ते थांबणार का, यावर फुलंब्रीचे निकाल अवलंबून असतील.