संतोष प्रधान

राष्ट्रवादी काँग्रेसने ७४ वर्षीय रामराजे नाईक-निंबाळकर यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून रामराजे साऱ्यांना परिचित आहेत. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यापाठोपाठ बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्याच्या राजकारणावर गेली तीन दशके वर्चस्व असलेल्या रामराजे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. साताऱ्यातील उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे दोघेही भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीत तशी नेतृत्वाची पोकळी आहे. शशिकांत शिंदे यांच्या मर्यादा आहेत. अशा वेळी जिल्ह्याच्या राजकारणाचे खाचखळगे अवगत असलेल्या रामराजे यांच्यावरच पक्षाने पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.

२००९ मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेत रामराजे यांचे प्राबल्य असलेला फलटण मतदारसंघ हा राखीव झाला. परिणामी विधानसभेत प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग बंद झाला. पण शरद पवार यांनी लगेचच रामराजे यांना विधान परिषदेवर संधी दिली. शिवाजीराव देशमुख यांच्यावर अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यावर सभापतीपदी रामराजे यांच्या नावाला पवारांनी पसंती दिली. तेव्हा सभापतीपदासाठी राष्ट्रवादीत बरीच रस्सीखेच होती. पण रामराजे हेच सभापती झाले. २०१६ मध्ये विधान परिषदेवर निवडून आल्यावर गेली सहा वर्षे रामराजे हेच सभापतीपद भूषवित आहेत.

श्रीकांत भारतीय : अभाविप कार्यकर्ता ते भाजपचे पडद्यामागील रणनीतीकार

कृष्णा खोरे विभागाचे मंत्रिपद भूषविताना कृष्णा खोऱ्यातील पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला अधिक कसे येईल याचा सारा अभ्यास किंवा नियोजन रामराजे यांनी केले होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र यांच्यात कृष्णा खोरे लवादासमोर सुरू असलेल्या सुनावणीत बारीक सारीक गोष्टींचा आढावा घेऊन त्या पद्धतीने महाराष्ट्राने कसा युक्तिवाद करावा याचे सारे नियोजन रामराजे करीत असत. कृष्णा खोऱ्याचे राज्याच्या वाट्याला आलेले पाणी वाटप करताना राष्ट्रवादीला त्याचा राजकीय फायदा कसा होईल या दृष्टीने सारे नियोजन हे रामराजे यांनीच केले होते. त्याचा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला फायदाही झाला. साताऱ्याच्या राजकारणात उदनयराजे भोसले यांना राजकीयदृष्ट्या शह देण्यातही रामराजे यांचा राष्ट्रवादीला उपयोग झाला.

१९९५ पासून रामराजे हे विधिमंडळाचे सदस्य आहेत. १९९५ मध्ये अपक्ष म्हणून फलटण मतदारसंघातून निवडून आल्यावर त्यांनी युती सरकारला पाठिंबा दिला होता. मनोहर जोशी मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्रीपद भूषविले होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्यांनी पक्षात प्रवेश केला. १९९९ मध्ये विलसराव देशमुख मंत्रिमंडळात त्यांनी महसूल व मदत आणि पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्रीपद भूषविले. लोकशाही आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदे भूषविली. २०१५ पासून ते विधान परिषदेचे सभापती आहेत.

जमिनीवरील कार्यकर्ता…आमश्या पाडवी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वयातही राष्ट्रवादीने रामराजे यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याने पुन्हा त्यांच्याकडेच सभापतीपद येईल का? याचीच आता उत्सुकता असेल.