राजकारणातील घराणेशाहीबद्दल नकारात्मक मत व्यक्त केले जात असतानाच या घराणेशाहीमध्ये बंडाची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. गेल्या आठवडाभरात देशातील दोन मोठ्या राजकीय घरातील वितुष्ट समोर आले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आपले थोरले चिरंजीव तेज प्रसाद यादव यांना पक्षातून तसेच कुटुंबातून निलंबित केल्याची घोषणा केली. बिहारमधील ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी तेलंगणातील भारत राष्ट्र समितीमधील घराणेशाहीने डोके वर काढले. माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनी पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप करीत पक्षाचे कार्याध्यक्ष आणि सख्खे बंधू के. रामाराव यांच्यावर तोफ डागली.
भारत राष्ट्र समिती या पक्षाचे भाजपमध्ये विलीनकरण करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. भाजपच्या विरोधात सौम्य भूमिका घेतली जात असल्याचा आरोप कविता यांनी केला. दिल्ली मद्य घोटाळ्यात कविता यांना ईडीने अटक केली होती. सुमारे वर्षभर तुरुंगात राहिल्यावर त्यांची जामिनीवर सुटका झाली. विधान परिषदेत गटनेतेपदी डावलले गेल्याची कविता यांची भावना आहे. तसेच पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात येत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन तेलुगू भाषक राज्यांमध्ये भाऊ-बहिणीचा वाद समोर आला आहे. आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहिण शर्मिला यांनी भावाच्या विरोधातच भूमिका घेतली होती. शर्मिला सध्या काँग्रेसच्या नेत्या आहेत.
देशात १९९० च्या दशकापासून घराणेशाही मोठ्या प्रमाणावर फोफावली. नेतेमंडळींनी सर्व सूत्रे घरातच राहतील अशी व्यवस्था केली. नेतेमंडळींची मुले, मुली, सुना, जावई, भाचे सारे राजकारणात पुढे आले. प्रत्येकाची राजकीय महत्त्वाकांक्षा बळावली, त्यातूनच पक्षांना फुटीचे ग्रहण लागले. इंदिरा गांधी यांची सून मनेका गांधी यांनी संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर बंडाचे निशाण रोवले होते. पुढे मनेक गांधी भाजपमध्ये दाखल झाल्या व केंद्रात मंत्री झाल्या.
महाराष्ट्रात ठाकरे, पवार आणि मुंडे या तीन मोठ्या राजकारण्यांच्या धरात वितुष्ट आले. विशेष म्हणजे या तिन्ही नेत्यांच्या पुतण्यांनी आपल्या काकांना अडचणीत आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात पुतणे राज ठाकरे यांनी बंडाचे निशाण रोवले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना पुतणे धनंजय यांनी आव्हान दिले होते. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली.
घराणेशाहीतून पक्षात वितुष्ट आलेले नेते :
मुलायमसिंह यादव : भाऊ शिवपाल यादव विरुद्ध मुलगा अखिलेश यादव
करुणानिधी : मुले स्टॅलिन विरुद्ध अलगिरी
प्रकाशसिंग बादल : मुलगा सुखबीरसिंग विरुद्ध भाचा मनप्रितसिंग बादल, जावई बिकरामसिंग मंजिठा
के. राजशेखर रेड्डी : मुलगा जगनमोहन विरुद्ध कन्या शर्मिला
देवेगौडा : मुले कुमारस्वामी विरुद्ध रेवण्णा
लालूप्रसाद यादव : मुले तेजप्रताप विरुद्ध तेजस्वी