सांंगली : सांगलीच्या जागेवरील आपला हक्क शाबित करून ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा व प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेले पंधरा दिवस यावरून वाद सुरू असून कोणत्याही स्थितीत मातोश्रीने दिलेला शब्द मागे घेतला जाणार नाही असे सांगत ठाकरे सेनेने प्रचारात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असली तरी मनात अजूनही धास्ती भरलेली आहे.

काँग्रेसने मेरीटवर म्हणजेच गुणवत्तेच्या, गावपातळीवरच्या ताकदीवर उमेदवारी निश्‍चित करण्याचा आग्रह धरला आहे, धनुष्यातून सुटलेला बाण आणि मातोश्रीवरून दिलेला शब्द मागे घेण्याची परंपरा नसल्याचे सांगत सेनेनेही सांगलीचा हट्ट कायम ठेवला आहे. यामुळे सांगलीची जागा सेनेकडून सोडवून पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणण्याची लढाई अगोदर नेत्यांना जिंकावी लागणार आहे. तरच भविष्यातील निवडणुका सुलभ आणि सुकर ठरणार आहेत.

हेही वाचा – नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी

सांगलीच्या जागेचा तिढा दिल्लीतील बैठकीत सुटेल असे वाटले होते. मात्र, मुळात महाविकास आघाडीचे जागा वाटप झाले असून आता पुन्हा सांगलीच्या जागेवर चर्चा करण्याची गरज नाही असे सांगत सेनेने उमेदवारी मागे घेतली जाणार नाही असे स्पष्ट संकेत दिले आहेत. सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेसला पंतप्रधान पद गमवायचे आहे का असा सवाल करत सेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिलवान चंद्रहार पाटील हेच आघाडीचे उमेदवार असतील असे ठासून सांगितले आहे.

हेही वाचा – शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरे विरोधाची तलवार म्यान

मविआला एकेक जागा महत्वाची आहे यात शंका नाही. जसा जागा वाटपाचा मविआमध्ये वाद आहे तसाच वाद महायुतीच्या जागावाटपातही आहे. हा वाद उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत राहणार यात शंका नाही. मात्र, सांगलीची स्थिती वेगळी आहे. काँग्रेस या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून विशाल पाटील यांची उमेदवारी निश्‍चित करून मशागत करत आहे. पेरणीच्या वेळीच ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून पहिलवान पाटील यांनी उमेदवारी मिळवली. आता या उमेदवारीला जनतेची साथ मिळते की नाही हे मतदानावेळी कळणार असले तरी मोर्चेबांधणीसाठी गावपातळीवर कार्यकर्त्यांची फळी भक्कम नाही. सगळा डोलारा आघाडीच्या ताकदीवरच उभा केला जाणार आहे. मात्र आघाडीत महत्वाचा खांब असलेल्या काँग्रेसनेच सवतासुभा मांडला तर मतविभाजनाचा फायदा घ्यायला भाजपा टपूनच आहे. मग एवढी यातायात करण्याचे प्रयोजनच धुळीस मिळण्याचा धोका आहे.

हेही वाचा – मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान

जर काँग्रेसला जागा मिळणारच नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय काँग्रेसकडून मांडला जात असला तरी तो वाटतो इतका सोपा मार्ग निश्‍चितच नाही. कारण या लढतीत मविआमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सहकार्याचा हात मिळेलच असे नाही. दुसर्‍या बाजूला ठाकरे शिवसेनेला केवळ राष्ट्रवादीच्या भरोशावर राहून चालणार नाही. यामुळे कोणत्याही स्थितीत पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवणे आणि मैदानात उतरणे ही बाब आता काँग्रेस नेत्यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. यात तोडगा निघावा यासाठी माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील यांच्यासह ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिल्ली दरबारापर्यंत धडक दिली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खा. के.सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रमेश चन्नीथला यांच्याकडे सांगलीच्या जागेचा आग्रह धरला. मात्र, केवळ चर्चेच्या फेर्‍या पूर्ण होत आहेत. मार्ग काही निघत नाही. आता माघार घ्यावी तर प्रतिष्ठा, इज्जत सगळेच पणाला लावले असल्याने काँग्रेसला मैदानात उतरलेच पाहिजे अशी स्थिती आहे. याचा परिणाम म्हणून मला नको, तुला नको, दे पाहुण्याला अशी गत होण्याचीच चिन्हे दिसत आहेत.