ठाणे : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेशात काही हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण सोहळ्यावर आपली आणि आपल्या पक्षाची छाप कशी राहील याची पूर्ण आखणी केल्याचे यानिमित्ताने दिसून आले. मोदी यांच्या जाहीर कार्यक्रमासाठी ठाण्यातील मैदान निवडीपासून गर्दी जमविण्यापर्यंत आवश्यक असलेली संपूर्ण यंत्रणा शिंदे यांच्या शिवसेनेकडून उभी करण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील शहरी-ग्रामीण पट्ट्यातील शाखाप्रमुखांपासून प्रमुख नेत्यांपर्यंत प्रत्येकाला या कार्यक्रमासाठी विशिष्ट अशी जबाबदारी नेमून देण्यात आली होती. शिवसेनेचा एखादा मेळावा भासावा या पद्धतीने शिंदे गटाचे आमदार, नेते, पदाधिकारी गेले आठवडाभर सक्रिय दिसत असताना ठाण्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना शनिवारी सकाळपर्यत या कार्यक्रमात आपली ‘जागा’ नेमकी कुठे असेल याचाही थांगपत्ता लागत नव्हता, असे चित्र होते.
विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लवकरच लागेल अशी चिन्हे दिसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारचा महाराष्ट्र दौरा महायुतीच्या राजकीय आखणीसाठी महत्त्वाचा ठरेल अशीच चिन्हे होती. मोदी यांच्या या दौऱ्याचा शेवटचा टप्पा हा महायुतीसाठी अतिशय महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या मुंबई, ठाण्याच्या दिशेने होता. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्याची आखणी करण्यात आली.
हेही वाचा >>> Narendra Modi In Thane : महाविकास आघाडी विकासाचा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र
हा कार्यक्रम बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच करावा असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरला आणि लाडकी बहीण योजनेच्या धनादेश वाटपाचे निमित्त साधत एक जंगी मेळावा घोडबंदर भागातील मोठ्या मैदानावर ठरविण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांच्या नवी मुंबई, मुंबईतील दौऱ्यानंतर पंतप्रधानांच्या महाराष्ट्रातील कार्यक्रमाच्या आखणीने जोर धरला आणि गेले आठवडाभर शिंदे यांच्या पक्षाची संपूर्ण यंत्रणा ठाण्यात राबताना दिसली.
भाजप नेते नावापुरते…. सूत्रधार शिंदे गटच
घोडबंदर भागातील वालावलकर यांच्या मूळ मालकीची असलेली जागा या कार्यक्रमासाठी निवडणे, तेथील टेकड्यांचे उतार सपाट करणे, दलदलीच्या जागा भरणे, याठिकाणी भव्य वाहनतळांची व्यवस्था करणे अशी संपूर्ण आखणी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात येत होती. या जागेच्या सपाटीकरणासाठी रायगड तसेच आसपासच्या भागातील दगडखाणींमधून खडी, माती आणण्याची व्यवस्था शासकीय यंत्रणांमार्फत शिंदे गटाचे पदाधिकारी करताना दिसत होते. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महापालिकेतील संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावताना येथील प्रमुख अभियंते, अधिकाऱ्यांशी संपर्काची जबाबदारीही शिंदे यांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी पाहात होते. सभास्थळांच्या नियोजनात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना फारसा वाव राहणार नाही अशी ‘व्यवस्था’ मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून पद्धतशीरपणे करण्यात आली होती. या कार्यक्रमात आपण नेमके कुठे बसायचे याचा थांगपत्ताही भाजपच्या काही प्रमुख नेत्यांना सकाळपर्यंत लागत नव्हता अशी परिस्थिती होती. पक्षाच्या एका आमदाराने यासंबंधीची नाराजी आयोजकांकडे बोलून दाखविल्याचे समजते. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ठरविण्यात आलेल्या चमूमध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मात्र स्थान देण्यात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाण्यातील पक्षाची संपूर्ण यंत्रणा या कार्यक्रमाच्या आयोजनात अग्रभागी दिसत असली तरी महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्त्यांचा सहभागही महत्त्वाचा होता. ठाणे आणि शिवसेना हे समीकरण नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण राहिले आहे. त्यामुळे ठाण्यात पंतप्रधानांच्या उपस्थित होणारा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक उत्साहाने अग्रभागी राहणे स्वाभाविक होते. – नरेश म्हस्के, खासदार, शिवसेना (शिंदे)
आजचा कार्यक्रम काही राजकीय नसला तरी महायुतीतील सर्व घटक पक्षाने एकत्रितपणे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात शासकीय यंत्रणा अग्रभागी होत्या. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आणि कार्यक्रम स्थळी देखील भाजपा नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना योग्य स्थान होते. – संजय केळकर आमदार भाजप