मुंबई: शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते येण्यास इच्छूक आहेत. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ‘पक्षाची ताकद’ अजमवण्याासाठी सर्व नेत्यांना तयारीला लागाचा संदेश देण्यात आला आहे. दोन्ही शिवसेना आणि भाजपला प्रतिष्ठेची असलेल्या मुंबईत २२७ प्रभागात लढण्याची तयारी केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर राज्याची विधानसभा पक्षाचे मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढली गेली असा दावा पक्षाचे नेते करीत आहेत. त्यांनी राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महायुतीला भरभरुन यश दिले. शिंदे यांचा ‘सर्वसामान्य माणूस’ आणि त्यांनी जाहीर केलेल्या लोककल्याणकारी आनंदाचा शिंधा, जेष्ठ नागरीकांसाठी तीर्थाटन सारख्या योजना जनमासात चांगल्याच लोकप्रिय झालेल्या आहेत. त्याचा फायदा महायुतीला झाला. लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद दिसून आली. या निवडणुकीत इच्छूक उमेदवारांची संख्या मर्यादीत होती.

भाजपच्या कलेने उमेदवारी द्यावी लागली. महायुतीत भाजप उमेदवारी देऊ शकत नाही अशा डझनभर उमेदवारांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी द्यावी लागली. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे ५७ आमदार निवडून आल्याने पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छूक उमेदवारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. उमेदवारी मिळण्याच्या आशेने शिवसेना ठाकरे पक्षाचे शिवबंधन जुगारुन शिंदे पक्षाचा भगवा झेंडा हाती घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

मुंबईत ठाकरे पक्षातील साठ पेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. पक्षाने मुंबईतील २२७ प्रभागांची तयारी करण्यास सांगितले आहे. मुंबई पालिका महायुतीमध्ये लढली जाणार असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले आहेत. तरीही तयारीला लागण्याच्या सूचना आहेत. मुंबईची जुळी बहीण असलेल्या नवी मुंबईत शिंदे आणि भाजपचे आमदार मंत्री गणेश नाईक यांच्यात विस्तव जात नाही. त्यामुळे या ठिकाणीही स्वबळावर लढण्याची तयारी स्थानिक नेते करीत आहेत. शिंदे यांचा चेहरा राज्यातील घराघरात पोहचला आहे.

प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना पक्षाने दिलेल्या आहेत. पक्षाची सदस्य नोंदणी सध्या सुरु आहे. विरोधकांना आर्श्चयाचा धक्का बसेल अशी सदस्य संख्या पक्षाची होणार आहे. महायुतीत म्हणून आम्ही लढणार आहोत पण काही ठिकाणी स्वबळाची तयारी ठेवली आहे, असे पक्षाचे सह प्रवक्ते राजू वाघमारे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.