scorecardresearch

शिरूर लोकसभा क्षेत्रातील कामांच्या निमित्ताने व राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवाजीराव आढळराव शिंदे गटात सक्रिय 

शिरूर लोकसभेअंतर्गत राष्ट्रवादीचे आमदार, खासदार व इतर नेते आणि आढळराव यांच्यातील राजकीय संघर्ष जुना आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही राष्ट्रवादीचे नेते वरचढ ठरत होते,

शिरूर लोकसभा क्षेत्रातील कामांच्या निमित्ताने व राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवाजीराव आढळराव शिंदे गटात सक्रिय 
शिवाजीराव आढळराव शिंदे गटात सक्रिय

बाळासाहेब जवळकर

माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघांतील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले असून यासंदर्भात स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. सत्ताकाळात राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयांना शह देण्याची खेळी यातून दिसून येते. शिरूर लोकसभेअंतर्गत राष्ट्रवादीचे आमदार, खासदार व इतर नेते आणि आढळराव यांच्यातील राजकीय संघर्ष जुना आहे.

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही राष्ट्रवादीचे नेते वरचढ ठरत होते, याचे शल्य आढळरावांना आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना ताकद देऊन त्यांचे राजकीय बळ वाढवले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर असतानाही शिवसेना नेत्यांना अपेक्षित पाठबळ दिले नाही, या नाराजीतूनच आढळरावांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून शिंदे गटात प्रवेश केला होता.या पार्श्वभूमीवर, आढळराव आणि जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, हवेली या भागातील अनेक विकासकामे तसेच लोकहिताचे प्रकल्प रखडले आहेत, त्यांना चालना मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक व्हावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शिरूर लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच या भागातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिल्याचे आढळराव यांनी म्हटले आहे.

राजगुरूनगर (खेड) येथील पंचायत समिती इमारतीचे काम पूर्वी मंजूर असलेल्या जागेवरच करावे. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर (हवेली) व समाधीस्थळ असलेल्या वढू (शिरूर) येथील अद्ययावत विकास आराखड्यास प्रशासकीय मंजुरी मिळवून निधी उपलब्ध करावा. आंबेगव्हाण (जुन्नर) येथील बिबट्याचा सफारी प्रकल्प लवकर हाती घ्यावा. जुन्नर तालुक्यातील पूर येथील आदिवासी समाजाचे दैवत श्री क्षेत्र कुकडेश्वर या प्राचीन मंदिराचे जतन व संवर्धन करावे. पुणे जिल्ह्यातील आदिवासींना वरदान ठरणाऱ्या हिरडा प्रकिया उद्योग या प्रकल्पास मंजुरी मिळावी, अशा मागण्या आढळराव आणि सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena ex mp shivajirao adhalrao patil join shinde group print politics news pkd