हर्षद कशाळकर

लोकसभेत शिवसेनेचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे, केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांचा पदभार सांभाळणारे, अनंत गीते सध्या विजनवासात गेले आहेत. जुन्या नेत्यांना बेदखल करून नव्या नेत्यांनी संधी देण्याचे धोरण शिवसेनेने स्वीकारले असून शिवसंपर्क अभियानापासून गीतेंना दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रायगड वजा अनंत गीते अशी नवी मांडणी शिवसेनेने सुरू केल्याचे चित्र आहे.

गेली दोन दशके शिवसेनेचे खासदार व ज्येष्ठनेते अशी अनंत गीते यांची ओळख आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाज हा त्यांचा हक्काचा मतदार होता. त्यामुळेच सलग सहा वेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा करिष्मा त्यांनी करून दाखविला आहे.  त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी शिवसेनेच्या माध्यमातून मिळाली. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर गीते यांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या कार्यक्रमातून त्यांना हळूहळू बेदखल करण्यात आले. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर श्रीवर्धन मधील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. गीतेंच्या वक्तव्यावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबध ताणले गेले होते. सुनील तटकरे यांनी गीतेंवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर शिवसेनेकडून गीतेंना अडगळीत टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. शिवसेनेच्या कार्यक्रमातील बॅनरवरूनही गीते बेदखल होत गेले.

करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला होता. माणगाव येथे जाहीर सभाही घेतली होती. या सभेपासूनही अनंत गीते यांना दूर ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्रे या निमित्ताने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे गेल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनी राज्यभरात शिवसंपर्क अभियानाला सुरवात केली आहे. या अभियात शिवसेनेचे मंत्री आणि खासदार राज्यभरात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. पक्षाचे काम लोकांपर्यंत पोहचवत आहेत. या शिवसंपर्क अभियानापासूनही गीते यांना दूर ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. शिवसंपर्क अभियानाच्या नियोजनाची धुरा आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे रायगड वजा अनंत गीते अशी नवी मांडणी शिवसेनेने सुरू केल्याचे दिसत आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी समाज मोठ्या संख्येने आहे. गीते या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा दुसरा मोठा नेता शिवसेनेकडे नाही. अशा परीस्थितीत गीतेंना पक्षातून बेदखल करण्याची किंमत शिवसेनेला आगामी काळात भोगावी लागणार का हा प्रश्न आहे. आगामी काळात शिवसेनेतून बेदखल झालेल्या गीतेंना भाजपकडून जवळ करण्याचे प्रयत्न झाल्यास नवल वाटायला नको.