छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडमधील हुकुमशाही, गुंडागर्दी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी. मतभेद असले, तरी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडमध्ये भाजपला साद घातली. सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. शिवसेना फुटीनंतर सिल्लोडमधील उद्धव ठाकरे यांची ही पहिली सभा आहे. गद्दारांना पाडा, याचकरीता ही निवडणूक असल्याचा दावा ठाकरे यांनी केला.

कर्नाटकमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला होता. त्याच पद्धतीने सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर होता. या वेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरील जमिनी बळकावणाऱ्याच्या आरोपांची यादीही त्यांनी वाचून दाखवली. मंत्रीपद देऊनही यांची भूकच शमत नाही. खाण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करतात. त्यामुळे सत्ता आल्यास चौकशी करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अनिल पटेल, कल्याण काळे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : दोन पाटलांमधील लढतीत कोणाची बाजी?

शिवसेनेची संस्कृती, विचार वेगळे

‘सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. मतभेद असतील तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. पण ही संधी आहे. सिल्लोडमध्ये पराभवासाठी प्रयत्न करायला हवेेत. शिवसेनेची संस्कृती, विचार वेगळे आहेत. सभेत मुस्लीम भगिनी बसल्या आहेत. हिंदुत्ववादी आहेत; तरीही त्यांना भीती वाटत नाही, त्यामुळे सिल्लोड आता भयमुक्त करू, गद्दारांचा पराभव करू, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशी करून कारवाई

अब्दुल सत्तार यांनी जमिनी बळकावल्या. भूखंडही पळवले. शासकीय मालमत्तांचा दुरुपयोग केला. व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर भिंत बांधून सर्वे क्रमांक ९२ हा अनधिकृत भूखंड ताब्यात घेतले. त्यात एक निवृत्त सैनिक आणि मुस्लिम व्यक्तीही आहेत. त्यामुळे सरकार आले, तर चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. सोयाबीनच्या भावाचा प्रश्न गंभीर आहे. सरकार आल्यास सात हजार भाव देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.