अमरावती : जिल्‍ह्यात वंचित बहुजन आघाडीमध्‍ये उभी फूट पडली असून पक्षादेश धुडकावून लावत वंचित बहुजन आघाडीचे जिल्‍हाध्‍यक्ष शैलेश गवई यांनी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्‍यासाठी धक्‍का मानला जात आहे. वंचित बहुजन आघाडीने अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे.

शैलेश गवई यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना रिपब्लिकन सेनेच्‍या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले. रिपब्लिकन सेनेचे काही पदाधिकारी हे वंचित बहुजन आघाडीच्‍या पदाधिकाऱ्यांचा सन्‍मान करीत नाहीत. कार्यकर्त्‍यांना सालगडी समजतात. त्‍यामुळे कार्यकर्त्‍यांमध्‍ये नाराजी व्‍यक्‍त होत होती. समाजाचा दबाव आणि कार्यकर्त्‍यांमधून विरोधाचा सूर यामुळे आपण काँग्रेसच्‍या उमेदवाराला पाठिंबा देण्‍याचा निर्णय घेतला आहे, असे शैलेश गवई यांनी सांगितले.

हेही वाचा – तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?

वंचित बहुजन महिला आघाडीच्‍या सचिव रेहाना खान, वंचितचे जिल्‍हा सरचिटणीस मेहराज खान आणि अब्‍दुल शकील यांनीही काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्‍या उमेदवारीविषयी सुरुवातीपासून गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा अपेक्षित होता. तो न मिळाल्याचे पाहून त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्‍यानंतर आपण अर्ज मागे घेऊ नये आणि उमेदवारी कायम ठेवावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकर यांनी केली होती. त्‍यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्‍यांना वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने पाठिंबा दिला.

हेही वाचा – हेमा मालिनींकडून शेतात खुरपणी तर रवी किशन चहाच्या टपरीवर; मतांसाठी कोण काय काय करतंय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता वंचित बहुजन आघाडीच्‍या जिल्‍हाध्‍यक्षांनीच पक्षादेश धुडकावल्‍याने त्‍यांच्‍याविषयी पक्षाचे अध्‍यक्ष प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात, याकडे अनेकांचे लक्ष आहे.