कोल्हापूर : ऊस दराच्या मुद्द्यावरून हंगाम सुरू होण्याआधीच साखरपट्ट्यांमध्ये शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. साखर सम्राटांचे कारखाने लक्ष्य करून ऊसतोड रोखली जात आहे. ऊस दराचा मुद्दा शेतकरी संघटनांकडून तापवला जात असताना दुसरीकडे त्यांच्यामध्ये अंतर्गत स्पर्धेचीही एक किनार आहे. याचवेळी साखर उद्योजकांना हंगाम सुरू कधी करायचा याचा पेच पडला असल्याने हंगामाचे गुंतागुंत वाढत चालली आहे.
यावर्षीचा हंगाम लवकर सुरू व्हावा असा राज्यातील साखर कारखानदारांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. बहुतेक साखर कारखान्यांच्या कार्यस्थळावर ऊस तोडणी यंत्रणा दाखल झाली आहे. दिवाळी संपल्यानंतर हंगाम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही कारखान्यांनी ऊसतोड सुरू केली आहे. मात्र ती सुरू होताच ऊस दरावरून शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.
अंकुशचा कारखानदारांवर अंकुश!
शिरोळचे आमदार, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घोडावत खांडसरी या जागी या गुळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्यात जाऊन आंदोलन अंकुश या संघटनेने मागील हंगामातील प्रति टन २०० रुपये आणि या हंगामासाठी ४ हजार रुपये दर दिल्याशिवाय हंगाम सुरू करू देणार नाही असे सांगत ऊस तोड रोखली आहे. यातून पोलीस आणि आंदोलकात झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. या कारवाई मुळे डगमगून न जाता आज मंगळवारीही जागोजागी ऊसतोड रोखण्याचे आदेश संघटनेचे प्रमुख अध्यक्ष धनाजी चडमुंगे यांनी दिलेले आहेत.
स्वाभिमानीची निर्णयाला मुरड
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समरजित घाटगे यांच्या कागल तालुक्यातील शाहू साखर कारखान्याची ऊसतोड त्यांच्या कार्यक्षेत्रात रोखली आहे. ऊस तोड करणारी वाहने परत पाठवून दिली जात आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्याचाही शेतकरी संघटनेचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होऊन त्यामध्ये यावर्षीच्या ऊस गळित हंगामासाठी प्रति टन ३७५१ रुपये इतका दर देण्यात यावा. अन्यथा साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
हंगाम सुरू झाल्यानंतर कारखानदारांनी मागणीप्रमाणे उसाची देयके न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी परिषदेत दिला होता.मात्र हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आधीच्या निर्णयाला मुरड घालून ऊसतोड रोखायला सुरुवात केली आहे. याशिवाय मराठवाडा, अहिल्यानगर या जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या स्थानिक नेतृत्वाने एफआरपी प्रमाणे (उचित व लाभकारी मूल्य ) उसाची देयके न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आंदोलन अंकुश या संघटने ऊसतोड रोखण्याचे पहिले आंदोलन हाती घेऊन आघाडी घेतली आहे. त्यामुळे स्वाभिमानीला हंगामानंतर आंदोलन करण्याची भूमिका थांबून ऊस तोड रोखणे भाग पडले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना अंतर्गतही ऊस दराच्या आंदोलनाची स्पर्धा दिसू लागली आहे.
सात संघटनांचे ठिय्या आंदोलन
मागील हंगामातील ऊस दरा संदर्भात आणि यावर्षीच्या हंगामातील ऊस दर जाहीर न करता कारखाने सुरू केले असल्याने प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर आणि जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना मंगळवारी जय शिवराय किसान संघटना, शरद जोशी शेतकरी संघटना, शेतकरी सेना (शिंदे गट), बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, आप पार्टी ,रयत संघटना (कर्नाटक ) यांनी निवेदन देऊन मागील हंगामाचा हिशोब दिल्याशिवाय कारखान्याने हंगाम सुरू करण्यापूर्वी द्यावा अन्यथा 6 नोव्हेंबर पासून साखर सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला अशी माहिती जय शिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिली. विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हंगामाचा गुंता शासन, साखर कारखानदार कशा पद्धतीने हाताळणार याकडे लक्ष वेधले आहे.
