अलिबाग– आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे महायुतीसाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या प्रस्ताव धुडकावून लावला आहे. आम्हाला आमची ताकद आणि हक्क माहिती आहे. त्यामुळे तो घेऊनच या निवडणूकीला आम्ही सामोर जाणार आहोत, युतीचे प्रस्ताव वर्तमानपत्रातून द्यायचे नसतात, त्यासाठी चर्चा होणे गरजेच असत म्हणत तटकरेंनी शिवसेनेच्या प्रस्तावाची खिल्ली उडवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युत्या आघाड्यांसाठी चर्चांना सुरवात झाली असतांनाच रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे महायुतीसाठी पुढाकार देत प्रस्ताव सादर केला होता.

अलिबाग येथे शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारीणीची बैठक मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत अलिबाग येथे पार पडली होती. या बैठकीला शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महायुतीसाठी नवीन फॉर्मुला पुढे करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५९ जागासाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे. तिथे त्या पक्षाने सात जागा लढवायच्या आहे. उर्वरीत तीन जागा या सामोपचाराने वाटून घ्यायच्या असा प्रस्ताव शिवसेनेनी ठेवला आहे. भरत गोगावले यांनी पक्षाच्या बैठकीनंतर या प्रस्तावाबबत माहिती दिली होती. हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पचनी पडणार नाही असा कयास बांधला जात होताच. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

कर्जत खालापूर तालुक्याची कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी बोलताना खासदार तटकरे यांनी या प्रस्तावाची खिल्ली उडवली आहे. गोगावले यांनी मांडलेले हिशोब मांडला. पण त्यांचा ज्ञान माझ्यापेक्षा अधिक आहे. त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. मी छोटा सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेले गणित मला काही कळलेले नाही. वर्तमानपत्रातून मला या प्रस्तावाबद्दल वाचालया मिळाले पण युतीचे प्रस्ताव हे वर्तमानपत्रातून द्यायचे नसतात, त्यासाठी समोरासमोर बसून चर्चा होणे अपेक्षित असते. आम्हाला आमची ताकद आणि हक्क माहिती आहे. त्यामुळे तो घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीमधील मतभेद आणि मनभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.