भारत जोडो यात्रेपूर्वी हिंगोली काँग्रेसमधील आमदार प्रज्ञा सातव आणि भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यातील अंतर्गत गटबाजी संपविण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रयत्न करूनही फारसे बरे चित्र नसल्याने आता सातव गटाच्या समर्थकांनी अशोक चव्हाण यांच्याकडे दाद मागितली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘आमच्याकडेही लक्ष द्या हो’ अशी कैफियत त्यांनी मांडली.

हेही वाचा- आभासी चलन प्रकरणात जालन्यातील आजी-माजी आमदार समोरासमोर

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव आणि अशोक चव्हाण यांच्यामध्येही राजकीय धुसफूस असे. मात्र, त्यांच्या निधनानंतर आमदार प्रज्ञा सातव यांनी त्यांच्या समर्थकांचा गट बांधला. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अनुभवी भाऊ पाटील गोरेगावकर यांना बळ दिले. बाळासाहेब थोरात यांचेही गोरेगावकर गटाकडे झुकते माप होते. त्यामुळे सातव गटातील समर्थकांनी आता अशोक चव्हाण यांच्याकडे दाद मागितली आहे.

हेही वाचा- तांबे यांना ‘सत्तेच्या पाण्याची तहान’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत जोडो यात्रेदरम्यान समजूत घालूनही सातव आणि भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यात फारशी दिलजमाई होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तत्कालिन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी या दोन्ही गटांना हाताच्या अंतरावर ठेवले. त्यामुळे दोन्ही गटांची मंडळी एकाकी पडली. हिंगोली नगरपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते शेख निहाल यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले काय होणार, अशी चिंता असणाऱ्या अनेकांनी नांदेड येथे जाऊन अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनायकराव देशमुख, शामराव जगताप, गजानन देशमुख, वसमतचे माजी नगराध्यक्ष हाफिजभाई, कार्याध्यक्ष मुनीर पटेल यांचा समावेश होता. या सर्वांना थोडा धीर धरा, असा सबुरीचा सल्ला चव्हाण यांनी दिला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.