सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले असल्याने गट निहाय आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. जिल्हा परिषद महिला अध्यक्ष होण्यासाठी प्रस्थापित नेत्यांनी सौभाग्यवतींसाठी चाचपणीही सुरू केली आहे. भाजपकडून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाईल असे सांगितले जात असले तरी पक्षात होत असलेली नेत्यांची आयात पाहता शत- प्रतिशतकडेच वाटचाल सुरू असल्याने सावध झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षानेही तालुकानिहाय आघाडीच्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.
जिल्हा परिषदेच्या ६१ जागा तर दहा पंचायत समितीसाठी १२२ जागा आहेत. महिला, ओबीसी, मागासवर्गिय आणि सर्वसाधारण हे आता स्पष्ट झाले आहे. दिवाळीचे फटाके संपल्यानंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने आमदारही आप-आपल्या मतदार संघातील शासकीय निधीतील कामांची उद्घाटने करण्यासाठी बाहेर पडले आहेत. या निमित्ताने उमेदवारांची चाचपणी आणि मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुंकांचा व प्रस्थापितांचा हिरमोड झाला आहे. जुळणी केली असताना गटच आरक्षित झाल्याने सगळ्या आशाआकांक्षा धुळीला मिळाल्या असल्या तरी महिला आरक्षण जाहीर झाल्याने आपल्या सौभाग्यवतीने पुढे करून गॅसबत्तीच्या भूमिकेत काही जण वावरत आहेत.ठोक मतांचा गठ्ठा हाताशी असल्याने त्या बळावर पुन्हा एकदा मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदेत स्थान मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
प्रस्थापित नेते आपल्या पत्नींच्या अथवा घरातील महिलेच्या माध्यमातून राजकीय सत्तेत राहण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. यामुळे या नेत्यांच्या घरातील महिलांची नावे चर्चेत आली आहेत. खुद्द खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील, आमदार सत्यजित देशमुख यांच्या पत्नी रेणुकादेवी देशमुख, आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी सोनिया बाबर, भावजय शीतल बाबर, जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक यांच्या पत्नी हर्षदा महाडिक, आमदार सदाभाउ खोत यांच्या सूनबाई मोहिनी सागर खोत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या पत्नी सुप्रिया पाटील आदी नावे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आली आहेत.
दरम्यान, राजकीय मोर्चेबांधणी दुसर्या पातळीवर सुरू आहे. भाजप स्वबळावर जास्तीत जास्त जागा लढवून सत्ता हस्तगत करण्याच्या तयारीत आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून अण्णा डांगे, वैभव पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, शरद लाड आदींचा पक्ष प्रवेश घडवून आणला. तर आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांची प्राथमिक बोलणी झाली आहेत. महाविकास आघाडी लढवली तर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची मदत होणे कठीण आहे. जत, आटपाडी, शिराळा येथील माजी आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, राजेंद्रअण्णा देशमुख यांना सोबत घेण्याची तयारी आहे. तसेच तासगावमधून माजी खासदार संजयकाका पाटील यांनीही महायुती सरकार विरोधात दंड थोपटले असून तेही या आघाडीत सहभागी होउ शकतात. भाजपकडून शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) यांना फारशा जागा दिल्या जातीलच असेही नाही. यामुळे निवडणुक झाल्यानंतर आबंड म्हणून या पक्षांची मदत घेण्याचे ठरवले जाउ शकते. खानापूरमध्ये शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे फारसे सख्य नाही. यामुळे आघाडीचे राजकारण करत असताना महायुती, महाविकास आघाडी अशी बंधने टाळून पडद्याआडची सोयरीक केली जाईल अशी चिन्हे आहेत.