कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंची मुदत संपून पाच दिवस झाले तरी नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याविषयी कुलपती तथा राज्यपालांकडून हालचाली सुरू झालेल्या दिसत नाहीत. या मुद्द्याला आता कोल्हापुरात राजकीय वळण मिळत आहे. उद्धव ठाकरे सेनेने विद्यापीठांसमोर मोकळी खुर्ची ठेवून आंदोलनाला हात घातला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांनी कुलगुरू नियुक्तीला उशीर होत असल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. हा रोष लक्षात घेऊन प्रभारी कुलगुरू निवड झाली असली तरी पूर्णवेळ निवडीकडे लक्ष लागले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. डी. टी. शिर्के यांची ७ ऑक्टोंबर २०२० रोजी नियुक्ती करण्यात आली होती. पाच वर्षाच्या कालावधीत डॉ. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे काम केले. त्यांची मुदत संपण्याची कालावधी राजभवनाला माहीत असणे अपेक्षित असते. तरीही कुलपती तथा राज्यपालांकडून अजूनही शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

नवीन कुलगुरू निवडी प्रक्रियेत विद्यापीठाचा एक प्रतिनिधी असतो. राज्यपालांकडून दोन प्रतिनिधी निवडले जातात. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाने सहा महिन्यापूर्वीच विद्यापीठ प्रतिनिधीचे नाव राज्यपालांना कळविलेले आहे. राज्यपालांकडून नियुक्त करावयच्या दोन सदस्यांची नावे अजूनही निश्चित झालेली नाहीत.मधल्या काळात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेत व्यस्त होते. त्यानंतर आचार्य देवव्रत यांची राज्यपाल म्हणून निवड करण्यात आली. या राजकीय घडामोडी लक्षात घेऊनही राज्यपालांकडे कुलगुरू निवडीची प्रक्रिया राबवण्यासाठी पुरेसा वेळ होता. परंतु, याबाबत राज्यपालांकडून विलंब का होत आहे याचा काहीच अंदाज येत नाही.

डॉ. शिर्के यांना निरोप देऊन पाच दिवस झाले तरी शिवाजी विद्यापीठ प्रथमच कुलगुरू, प्रभारी कुलगुरू विना राहिले आहे. नवीन कुलगुरू निवडीसाठी जाहिरात देऊन प्रस्ताव, निवड समितीकडून छाननी, मुलाखत, नियुक्ती या प्रक्रियेसाठी किमान तीन महिन्याचा कालावधी अपेक्षित असतो. ही सर्व प्रक्रिया आजी – माजी राज्यपालांना विदित असूनही त्याबाबत विलंब होत असल्याने विद्यापीठ वर्तुळात सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दुसरीकडे आता हा मुद्दा राजकीय वळणावर येऊन ठेपला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात कुलगुरूपद रिक्त राहण्याची नामुष्की उद्भवल्याने त्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे शिवसेनेने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर रिकामी खुर्ची ठेवून प्रतीकात्मक आंदोलन केले. विद्यापीठाला कुलगुरू मिळेल का, अशी संतप्त विचारणा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनजीत माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, शहर प्रमुख सुमित मेळवंकी, युवती सेनेच्या कृष्णा जाधव आदींनी केली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह नाही, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०-१६ मधील कलम ११ (८) नुसार राज्यपाल तथा कुलपती यांनी तात्काळ प्रभारी कुलगुरू नेमणे अपेक्षित असते. अद्याप कोणताही आदेश निघालेला नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त करीत आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. राजकीय नेत्यांकडून होणारा संताप, आंदोलने याची दखल घेऊन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठ प्रभारी कुलगुरू पदाची सोपवण्यात आली असून त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला आहे. तथापि पूर्णवेळ कुलगुरू निवडीसाठी संबंधित यंत्रणेला जाग येणार का याकडे लक्ष लागले आहे.