scorecardresearch

विदर्भात गुंतवणूक करण्यासाठी डाव्होसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्रातीलच

डाव्होसमधील जागतिक परिषदेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ गेले होते. येथे विविध उद्योगांशी एक लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले.

विदर्भात गुंतवणूक करण्यासाठी डाव्होसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्रातीलच
विदर्भात गुंतवणूक करण्यासाठी डाव्होसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्रातीलच (लोकसत्ता ग्राफिक्स)

नागपूर : स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत ज्या कंपन्यांनी विदर्भात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार केले त्यापैकी तीन कंपन्या या महाराष्ट्रातील चंद्रपूर, जालना व औरंगाबाद येथील असल्याची माहिती उघड झाली आहे. या कंपन्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गुंतवणूक करणार आहेत हे येथे उल्लेखनीय.

डाव्होसमधील जागतिक परिषदेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ गेले होते. येथे विविध उद्योगांशी एक लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. त्यात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात २२ हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्या तीन कंपन्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा – नागपूर : कारागृहातून सुटल्यानंतर अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना तिसरे पत्र

अमेरिकेची न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून कोल गॅसीफिकेशन प्रकल्प उभारणीसाठी ( रोजगार १५ हजार), ब्रिटनच्या वरद फेरो ॲलॉईजने गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प ( रोजगार २ हजार) उभारणीसाठी, तर इस्त्रायलच्या राजुरी स्टील्स ॲण्ड ॲलॉईजने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प ( रोजगार १ हजार) उभारण्यासाठी सामंजस्य करार दाओसमध्ये केले होते. मात्र, वरील तीनही कंपन्या महाराष्ट्रातील औरंगाबाद, चंद्रपूर आणि जालना येथील असल्याची बाब समोर आली आहे.

न्यू एज क्लिनटेक सोल्यूशन प्रा. लि. ही कंपनी इटखेडा, औरंगाबादची आहे. कंपनीची नोंदणी २ जून २०२२ रोजी झाली. या कंपनीचे संचालक गोपीनाथ लटपटे, बाळासाहेब दराडे आणि निहित अग्रवाल हे आहेत. फेरो अलॉय प्रा.लि. ही जालन्याची कंपनी आहे. या कंपनीची नोंदणी १७ जुलै २०१७ रोजी झाली आहे. कंपनीचे संचालक गौरव कासट आणि दीपेश माधनी हे आहेत.

हेही वाचा – पहिली बाजू: गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य

राजुरी स्टील अँड अलॉय इंडिया प्रा.लि. ही कंपनी चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. कंपनीची नोंदणी १२ जून २०१० रोजी झाली. त्याचे कार्यालय मुलुंड, पश्चिम मुंबई असे नमूद आहे. कंपनीच्या संचालक मोनिका जैन आणि विवेक बेरीवाल आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 17:43 IST

संबंधित बातम्या