कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला काही महिने उरले असताना राजकीय संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तीन दिवसांपूर्वी (दि. २ मार्च) बेळगावपासून २० किमी अंतरावर असलेल्या राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३६ फुटांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी पुन्हा (दि. ५ मार्च) एकदा या पुतळ्याचे अनावरण केले. एकाच पुतळ्याचे दोनदा अनावरण झाल्यानंतर माजी मंत्री आणि गोकाक मतदारसंघाचे भाजपाचे आमदार रमेश जारकीहोळी आणि बेळगावच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा टक्का पाहता, दोन्ही पक्षांसाठी हा विषय महत्त्वाचा होता.
काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अलीकडेच या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम जाहीर करत ५ मार्च ही तारीख ठरवली होती. परंतु त्याआधीच मुख्यंमत्री बोम्मई यांनी २ मार्च रोजी पुतळ्याचे अनावरण केले. यानंतर बोम्मई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “माझ्या कानावर ही गोष्ट आलेली नाही. (दुसऱ्यांदा पुतळ्याचे अनावरण करणेबाबत) परंतु त्याठिकाणी कुणीही जाऊन आदरभाव व्यक्त करू शकतात. मात्र काँग्रेसने केलेल्या कृतीमधून त्यांची सत्तालालसेची इच्छा दिसत आहे.”
हे वाचा >> ‘आप’ची कर्नाटकमध्ये एंट्री; पहिल्याच जाहीर सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करत हल्लाबोल
काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुख्यमंत्री बोम्मईंच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालून ५ मार्च रोजी स्वतः अनावरण करण्यासाठी पुढे सरसावल्या. यावेळी कर्नाटकमधील कोणताही काँग्रेसचा बडा नेता त्यांच्यासोबत नव्हता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यापैकी कुणीही नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. याउलट महाराष्ट्रातून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी भोसले, आमदार सतेज पाटील, लातूर ग्रामीण आमदार धीरज देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते. हेब्बाळकर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रंगरंगोटी अर्धीच झाली असताना अनावरण करण्याचा घाट घालण्यात आला. फक्त १२ मिनिटांत हा कार्यक्रम उरकला. हा शिवाजी महाराजांचा अवमान आहे. मी मुख्यमंत्री बोम्मई यांचा आदर करते, पण त्यांची दिशाभूल करून त्यांना या अनावरण कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.
हे वाचा >> विश्लेषण : कर्नाटकचे कन्नड भाषा विधेयक काय आहे? माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना विधेयक कठोर का वाटते?
भाजपाचे नेते, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी राजहंसगड किल्ल्याच्या विकासकामांसाठी १४ कोटींचा निधी दिला होता. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी २ मार्च रोजीच्या कार्यक्रमात आणखी ५ कोटींचा निधी देत असल्याची घोषणा केली. बेळगाव जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ येतात. बेळगावच्या बाजूच्या जिल्ह्यांवरदेखील बेळगावातील जनमताचा प्रभाव आहे. जिल्ह्यातील केवळ चार जागा काँग्रेसकडे आहेत, तर उर्वरित जागांवर भाजपाचे आमदार आहेत.
निवडणूक जवळ येताच बेळगाववर वर्चस्व मिळवण्यासाठी आमदार रमेश जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. २०२१ मध्ये अश्लील सीडीकांडमध्ये जारकीहोळी यांनी काँग्रेस नेते शिवकुमार आणि हेब्बाळकर यांच्यावर आरोप केले होते. या सीडी प्रकरणामुळे जारकीहोळी यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला होता.
बेळगावमध्ये मराठी भाषिक लोकांची संख्या लक्षात घेता नुकतेच बेळगाव महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी भाजपाने मराठी भाषिक उमेदवार निवडले होते. २०११ च्या जनगणनेमनुसार बेळगावमध्ये १८.७१ टक्के लोक मराठी भाषिक आहेत. तर ६८.४० लोक कन्नड भाषिक आहेत.