Uddhav Raj alliance: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी १२ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर मनसे भाजपाशी हातमिळवणी करणार की काय या शक्यतेवर चर्चा रंगू लागली. गेले अनेक दिवस सुरू असलेल्या उद्धव-राज युतीबाबत शिवसेना (उबाठा)प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सकारात्मक संकेत दिले आहेत. मात्र, दुसरीकडे आधी युतीसाठी सकारात्मक असलेले राज ठाकरे आता मात्र मौन बाळगून आहेत. त्याशिवाय त्यांच्या पक्षातील नेतेसुद्धा युतीच्या शक्यतेबाबत नकार देत असल्याने आता पुढे काय होणार याकडे विशेषत: मराठी माणसाचे लक्ष लागून राहिले आहे. “महाराष्ट्रातील लोक आणि सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे तेच करू. आम्ही आमच्यातील प्रश्न सोडवण्यास सक्षम आहोत, इतरांनी त्याची काळजी करण्याची गरज नाही”, असे शिवसेना (उबाठा)चे उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात म्हटले आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीचा उल्लेखही उद्धव यांनी केला. त्याचबरोबर दोन भावांचे पुनर्मिलन रोखण्याचा आरोपही त्यांनी भाजपावर केला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) – मनसे युती झाल्यास त्याचे परिणाम काय होतील याचा भाजपाला पुरेपूर अंदाज आहे म्हणून त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचेही ते म्हणाले. एप्रिलमध्ये राज ठाकरे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्यास तयार असल्याचे सकारात्मक संकेत दिले होते. त्यानंतर उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासह सेनेच्या अनेक नेत्यांनी मनसेशी युती करण्याची तयारी असल्याचे सातत्याने म्हटले आहे.

सेनेचा हात पुढेच

राज्याच्या व्यापक हितासाठी मराठी माणूस एकत्र येत असल्याचे संकेत सेनेने त्यांची भाषणं, पोस्टर्स आणि सामना या त्यांच्या मुखपत्रातूनही दिले आहेत. त्यामुळे सेनेकडून हा विषय ओळख, वारसा आणि मराठी माणसाचं कारण या मुद्द्यांच्या अनुषंगाने स्पष्ट आहे. ६ जून रोजीही उद्धव यांनी स्वत: युतीसाठी सकारात्मक चर्चेचे संकेत दिले. “माझ्या मनात किंवा माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नाही. मनसे कार्यकर्तेही आमच्या संपर्कात आहेत”, असे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे, तेच घडेल, असेही ते म्हणाले होते. दुसऱ्या दिवशी सेनेच्या मुखपत्रातही पहिल्या पानावर दोन्ही भावांचा एकत्रित फोटो प्रकाशित करण्यात आला होता. गेल्या २० वर्षांत न पाहिलेले एक दुर्मीळ प्रतीकात्मक पाऊल अशी या फोटोची कॅप्शन होती. मुंबई, ठाणे आणि राज्याच्या इतर भागांत लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये बाहेरील लोकांपासून मराठी माणसाला वाचवण्यासाठी संयुक्त ठाकरे आघाडी हवी, अशी मागणीही करण्यात आली होती.

त्यावरून सेनेने आपल्या भूमिकेतून भावना व्यक्त केल्या, जुने फोटो जिवंत केले, मराठी एकतेचे आवाहन केले आणि राज्यासाठी अहंकाराचा त्याग करण्याची तयारी असल्याचे जाहीरपणे दाखवून दिले, असे दिसून येते. मात्र, गेल्या दोन महिन्यांत मनसे नेतृत्वाकडून मिळालेला प्रतिसाद सावधगिरीचा आणि काही वेळा नाकारणारा दिसला आहे. राज यांनी अंतर्गत बैठका घेतल्या, माध्यमांशीही ते फारसे स्पष्टपणे बोलले नाहीत. १९ एप्रिल रोजी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये ते युतीबाबत बोलल्यानंतर राज यांनी पुन्हा सार्वजनिकरीत्या कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यावेळी राज यांनी म्हटले होते, “महाराष्ट्राचे हित वैयक्तिक मतभेदांपेक्षा मोठे आहे.” या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरे यांनीही लगेचच याबाबत भाष्य केले होते. “गरज पडल्यास आम्ही महाराष्ट्रासाठी, मराठी लोकांसाठी आणि मराठी भाषेसाठी एकत्र येण्यास तयार आहोत”, असे उद्धव यांनी म्हटले होते.

महत्त्वाचे मुद्दे:

  • पॉडकास्टमध्ये राज ठाकरे यांच्याकडून हा‍तमिळवणीसाठी सकारात्मक वक्तव्य
  • शिवसेना (उबाठा) उद्धव ठाकरेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद
  • राज्यभरात दोन भावांच्या मनोमिलनाची होर्डिग्स
  • दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सकारात्मक हालचाली
  • राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड भेट
  • मनसे भाजपाशी हातमिळवणी करण्याची चर्चा
  • भेटीनंतर राज ठाकरेंनी बाळगलं ठाकरे आघाडीकडून मौन

त्यानंतर सेना नेतृत्व आणि कार्यकर्त्यांकडूनही दोन्ही भावांना एकत्र येण्याचे आवाहन करणारे संदेश राज्यभरात पसरवण्यात आले. संजय राऊत यांनी २२ एप्रिलला म्हटले होते, “उद्धव हे युतीच्या कल्पनेवर खूप सकारात्मक आहेत.” तसेच आदित्य ठाकरे यांनीही मे महिन्यात अनेकदा महाराष्ट्रासाठी शुद्ध हेतू असलेले आणि महाराष्ट्रविरोधी भाजपा शक्तींना विरोध करणारे कोणीही पक्षात स्वागतार्ह आहेत, असे म्हटले होते.

ठाकरे आघाडी होणार की नाही? (फोटो: संग्रहीत)

मनसेचा मात्र थंड प्रतिसाद

उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद पाहता, मराठी मतांचे विभाजन रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या महाराष्ट्रात शिवसेना(उबाठा), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मनसे असे तीन गट झाले आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा नेमका याचाच फायदा घेण्याची शक्यता आहे. ठाकरे आघाडी किमान १० प्रमुख शहरांमध्ये मराठी मतदारांना एकत्र करू शकते. सध्या भाजपा-शिंदे युती विभाजित विरोधी पक्षांचा सामना करत स्पर्धेत उतरत आहे; तर मनसे राजनैतिक सहयोगी किंवा फूट पडलेला अनिश्चित घटक ठरण्याची शक्यता आहे. असे असताना राज यांच्या विधानानंतर मनसेने मात्र अंतर राखत अनेकदा युतीची कल्पना फेटाळून लावली. मनसे नेते आणि मुंबई पक्षप्रमुख संदीप देशपांडे यांनी स्पष्टपण म्हटले, “मराठीच्या मुद्द्यावर आधारित एकता ही निवडणूक आघाडीपेक्षा वेगळी आहे. मराठी माणसंदेखील महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ शकतात. निवडणुकीसाठी युती ही संकुचित विचारसरणीची कल्पना आहे.” त्यातून, जागा आणि मतदान नव्हे, तर मुद्द्यांवर आधारित एकता हा संदेश स्पष्ट होता. त्याच्या तीन दिवसांनंतर ते म्हणाले की, जर सेनेला युती हवी असेल, तर त्यांना तसा औपचारिक प्रस्ताव द्यावा लागेल. मनसेने आधीच्या प्रयत्नांच्या बदल्यात विश्वासघात झाला होता, असेही ते म्हणाले.

“युती कॅमेऱ्यांसमोर होत नाही. निर्णय ऑफरनंतर होतात. आम्ही यावेळी सावध राहू. संजय राऊत यांनी उद्धव यांना थेट राज यांना फोन करण्यास सांगावे. त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल”, असे संदीप देशपांडे म्हणाले होते. “चार महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंचे फोटो वापरण्यावरही शिवसेनेला आक्षेप होता आणि अचानक युतीसाठी सेना इतकी सकारात्मक कशी झाली? हे त्यांच्या राजकीय परिस्थितीमुळे आहे का? विधानसभा निवडणुकीत त्यांना फक्त २० जागा जिंकता आल्या, म्हणून का? जर त्यांनी ६० जागा जिंकल्या असत्या, तर ते इतके उत्साही झाले असते का?” असेही देशपांडे म्हणाले.

मनसेचा दृष्टिकोन काय?

ठाकरे पुनर्मि‍लनाची कल्पना मराठी मतदारांच्या एका मोठ्या वर्गाला आकर्षित करते. खासकरून त्यांना ज्यांना अविभाजित शिवसेनेबाबत माहिती आहे. मात्र, सध्या तरी उद्धव आणि राज यांच्यात थेट संवाद होईपर्यंत युती ही रणनीतीपेक्षा अनुमानाचा विषय आहे. मनसेच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भावनिक आवाहनांमागे सेनेचा एक स्पष्ट हेतू आहे. यामागचे पहिले कारण म्हणजे २०२२ मध्ये झालेले शिवसेनेचे विभाजन, दुसरे म्हणजे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि तिसरे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून गमावलेले पक्षाचे चिन्ह. महत्त्वाचा हेतू म्हणजे सेना आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मुंबई, ठाणे व नाशिक, पुण्याच्या काही भागांत जिथे मनसेचा प्रभाव अजूनही कायम आहे, तिथे आपला पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

याव्यतिरिक्त पक्षातील सूत्रांना असाही धोका वाटतो की, कोणत्याही युतीमुळे मनसेला छोटा भाऊ म्हणून वागवणे नुकसानीचे आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये मनसेचे नुकसानच होईल. “शिवसेना आम्हाला आमच्या मतांसाठी हवी आहे; पण ते आम्हाला जागा देणार नाहीत. राज त्या सापळ्यात का अडकतील?”, असे एका मनसे नेत्याने म्हटले आहे. असे असताना २०१४ ते २०१९ दरम्यान झालेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या आकडेवारीवरून दिसून येते की, मनसेचे नागरी संस्थांमध्ये मर्यादित अस्तित्व राहिले आहे. २७ पैकी २१ महानगरपालिकांमध्ये निवडणूक लढवणाऱ्या मनसेने एकूण २,७३६ जागांपैकी फक्त २६ जागा जिंकल्या. त्यांना एकूण ३.५६ टक्के एवढी मते मिळाली. २००९ ते २०१४ पर्यंतच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेने एकूण २,५४३ जागांपैकी १६२ जागा जिंकल्या आणि १२.४३ टक्के इतकी मते मिळवली.

एकंदर या सगळ्यात वैचारिक अस्वस्थता या भूमिका बजावत आहे. गेल्या पाच वर्षांत हिंदुत्वाकडे झुकलेल्या मनसेला सेनेच्या सध्याच्या इंडिया आघाडी यांच्याकडूनही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. “मनसेने कायम आपली स्वतंत्र ओळख टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष केला आहे. जर आपण उद्धव यांच्याशी युती केली, तर त्यांना वैधता आणि संख्याबळ मिळेल”, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. भाजपाला मनसेला सत्ताधारी महायुतीत आणण्याचा फायदा तर स्पष्ट आहे. प्रामुख्याने शहरी भागात जिथे मराठी तरुणांमध्ये प्रादेशिक संघटनांचा प्रभाव आहे. बेकायदा स्थलांतर, मशिदींवरील भोंगा याबाबत मनसेची असलेली ठाम भूमिका भाजपाच्या शहरी हिंदुत्व धोरणासाठी साजेशी आहे. राज यांनी जर भाजपाशी हातमिळवणी केली, तर ती युती त्यांच्यासाठी व्यवहारात्मक असेल, वैचारिक किंवा भावनिक नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.