PM in Bihar: तीन देशांचा दौरा पूर्ण केल्यानंतर एकच दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २० जून शुक्रवारी बिहारला भेट देणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. सिवानच्या दौऱ्याला विकासात्मक आणि राजकीय महत्त्व आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. राज्यात एनडीएच्या प्रचाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. जवळपास १० हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे अनावरण पंतप्रधान करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये बिहारमधील पाटलीपुत्र आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन यांचा समावेश आहे.

बिहारमधील राजकीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. सिवान हा एकेकाळी राष्ट्रीय जनता दलाचे बलाढ्य नेते आणि राजकारणी मोहम्मद शहाबुद्दीन यांचा बालेकिल्ला होता. येत्या निवडणुकांच्या प्रचारासाठी बिहार आठ झोनमध्ये विभागण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या सूत्रांनी असे संकेत दिले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात एनडीएच्या संपर्क करण्याच्या प्रयत्नांमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावतील.

असं असताना नरेंद्र मोदींच्या बिहार भेटीदरम्यान केवळ निवडणुकीच्या राजकारणावरच लक्ष केंद्रित केलेले नाही. बिहार राज्याचे रूपांतर करण्यासाठी विविध विकास आणि कल्याणकारी उपक्रम सादर करण्यावर सत्ताधारी पक्ष अधिक जोर देत आहे.

पंतप्रधानांच्या बिहार दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे अनावरण होणार आहे

  • बेतिया वीज पुरवठा प्रकल्प – ६९ कोटी रूपये
  • छपरा पाणी पुरवठा प्रकल्प – १९ कोटी रूपये
  • बक्सर पाणी पुरवठा प्रकल्प – १५६ कोटी रूपये
  • मोतिहारी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प – ४०० कोटी रूपये
  • बक्सर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प – २५६ कोटी रूपये
  • सासाराम सांडपाणी नेटवर्क आणि प्रक्रिया प्रकल्प – ४५६ कोटी रूपये
  • सिवान सांडपाणी नेटवर्क आणि प्रक्रिया प्रकल्प – ३६७ कोटी रूपये
  • अर्राह पाणी पुरवठा प्रकल्प – १३८ कोटी रूपये
  • सिवान पाणी पुरवठा प्रकल्प – ११३ कोटी रूपये
  • सासाराम पाणी पुरवठा प्रकल्प – ७७ कोटी रूपये
  • बेगुसराय पाणी पुरवठा प्रकल्प – १३३ कोटी रूपये
  • मोतिहारी आय अँड डी आणि एसटीपी प्रकल्प – १४९ कोटी रूपये
  • कसबौल आय अँड डी आणि एसटीपी प्रकल्प – ७९ कोटी रूपये
  • बक्सर आय अँड डी आणि एसटीपी प्रकल्प – २५७ कोटी रूपये
  • अर्राह आय अँड डी आणि एसटीपी प्रकल्प – ३२८ कोटी रूपये

निवडणूक जवळ येत असताना एनडीएने अद्याप बिहारमध्ये जागावाटपाची चर्चा केलेली नाही. सध्या तरी असे संकेत दिसत आहेत की भाजपा आणि जेडीयू दोन्हीही समान जागांवर निवडणूक लढवतील आणि नितीश कुमार या आघाडीचे नेतृत्व करतील. बिहारमधील एनडीएचे मुख्य रणनीतीकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अलिकडेच बिहार दौरा होणार नियोजित होता. मात्र, इतर कामांमुळे त्यांना तो पुढे ढकलावा लागला. येत्या १५ दिवसांमध्ये ते बिहार दौरा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रातील त्यांच्या प्रचार रणनीतीनुसार, अमित शाह मोठ्या सार्वजनिक सभांऐवजी पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेण्याची शक्यताही आहे. “कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत अमित शाहांसारखे दुसरे कोणीच नाही. पक्षाच्या राज्यातील विभागनिहाय कार्यकर्त्यांशी त्यांचे संबंध खूप चांगले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये कार्यकर्त्यांचे भविष्य घडवण्यात निर्णायक भूमिका बजावतील”, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

दरम्यान, जून महिन्याअखेरीस निवडणूक आयोग बिहारला भेट देण्याची शक्यता आहे. त्यावेळी अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या पुराच्या परिणामांचा आढावाही घेतला जाईल. राज्यातील निवडणुका दोन ते तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसत आहे. भाजपा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान राजकारणात सक्रीय होण्याचा तसंच विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय सहजासहजी जाहीर झालेला नाही. या निर्णयामागे भाजपाचीच रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान बिहारमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान आणि मतमोजणी पूर्ण होऊ शकते अशीही शक्यता आहे. या निवडणुकीत महाआघाडीची तयारी एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे एनडीएने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी गड बांधण्यास सुरूवात केली आहे. आरजेडीने काही एनडीए नेत्यांचा पक्षात समावेश केला असेल तर जेडीयू-भाजपानेही पक्ष बदललेल्या आरजेडी नेत्यांना सामील केले आहे.
२०२४च्या विधानसभा निवडणुकीत तायर झालेल्या महाराष्ट्र मॉडेलचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून कौतुक करण्यात आले होते. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन २२५+’ चे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र मॉडेलचा भाजपाला किती फायदा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.