परभणी : लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार संजय जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी अद्याप महायुतीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. परभणीची जागा राष्ट्रवादीतल्या अजित पवार गटाला मिळणार असून राजेश विटेकर हे प्रमुख दावेदार असल्याचेही गेल्या काही दिवसांपासून चर्चिले जात आहे. तथापि ठामपणे अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित होताना दिसत नाही. त्यातच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनीही खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपली निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने गेल्या दोन दिवसांपासून महायुतीत परभणीची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला की भाजपला अशी नवी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्या दृष्टीने इच्छुक उमेदवार राजेश विटेकर यांचे दौरेही सुरू झाले. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. गेल्या दोन दिवसांत शहरात विटेकर यांनी शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यातच चार-पाच दिवसांपूर्वी माजी आमदार बोर्डीकर यांनी फडणवीस यांची भेट घेऊन परभणीची जागा भारतीय जनता पक्षाला सोडवून घेण्याच्या संदर्भात चर्चा केली आहे. भारतीय जनता पक्षाने अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत परभणीची जागा आपल्याकडे कशी खेचून घेता येईल यासाठी प्रयत्न चालवले आहेत. विशेषतः बोर्डीकर त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा – शहांनी बडदास्त ठेवलेले उदयनराजे आता भेटीसाठीही तरसले!

महायुतीच्या स्तरावर आतापर्यंत अनेक बैठका स्थानिक पातळीवर पार पडल्या आहेत. या बैठकांना भाजप तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित राहताना दिसत आहेत. प्रत्येक वेळी जागा कोणालाही सुटो पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळकट करण्यासाठी परभणीची जागा विजयी करू, असे आवाहन केले जाते. त्यापलीकडे चर्चा जात नाही. कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही मन लावून काम करू अशा आणाभाका घेतल्या जातात. प्रत्यक्षात पक्षनेतृत्वाने विटेकर यांना कामाला लागा असे सांगितले असले तरी बोर्डीकर यांनीही आपली बाजू भाजपच्या नेतृत्वाकडे लावून धरली आहे.

हेही वाचा – मराठा आंदोलनाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

बोर्डीकर यांनी स्थानिक पातळीवर विजय भांबळे यांच्याशी दोन दशकांहून अधिक काळ राष्ट्रवादीला प्रखर विरोध केला आहे. घड्याळ हेच त्यांचे विरोधी चिन्ह राहत आले आहे. एवढेच नाही तर स्थानिक पातळीवर भांबळे यांना विरोध करत असतानाच वरिष्ठ पातळीवर अजित पवार यांच्यासह बोर्डीकरांचा संघर्ष कायम राहिला. हा विरोध त्यांनी अतिशय भक्कमपणे केला. अजित पवारही भाषणातून बोर्डीकरांच्या विरोधात वक्तव्य करायचे आणि बोर्डीकरांनीही जिंतूर तालुक्यात अक्षरशः काळे झेंडे दाखवून अजित पवारांना विरोध केलेला आहे. मात्र, राजकारणाचे संदर्भ बदलल्याने सध्याची परिस्थिती बदलली आहे. तरीही आतापर्यंत राष्ट्रवादीला विरोध केला आणि आता पुन्हा घड्याळाचे काम कसे करायचे, असा बोर्डीकरांच्या समोरचा पेच आहे. आजवर घड्याळाला विरोध केला. आता पुन्हा घड्याळाला मतदान करा, असे कोणत्या तोंडाने सांगणार, अशी बोर्डीकरांच्या कार्यकर्त्यांचीही भावना आहे.

हेही वाचा – मुलाच्या ‘कल्याणा’साठी मुख्यमंत्र्यांचे सारे काही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घड्याळाच्या काट्यांचा अडसर !

परभणीत लोकसभा मतदारसंघावर असलेले शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढायचे असेल तर उमेदवाराचे कमळ हेच चिन्ह हवे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या पक्षाची शिवसेनेशी लढत लोकसभेला होते. आजवर राष्ट्रवादी लोकसभेच्या सर्व निवडणुका हरल्या आहेत. महायुतीचा उमेदवार जर घड्याळाच्या चिन्हावर असेल तर निवडणूक सोपी जाणार नाही. कमळाच्या चिन्हावर असेल तरच निवडणूक सोपी जाईल, असाही युक्तिवाद गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. खुद्द बोर्डीकर यांनी एका पत्रकार बैठकीत तशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यावरून महायुतीत अद्यापही उमेदवार तसेच निवडणूक चिन्हावरूनही संभ्रम असल्याचे दिसून येते. एकीकडे परभणीची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटली असे चर्चिले जात असताना भारतीय जनता पक्षाचेही प्रयत्न थांबलेले नाहीत. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित असताना अद्याप महायुतीत मात्र संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.