Who is Harmeet Harmeet Singh Pathanmajra : पंजाबमधील आम आदमी पार्टीचे पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार हरमित सिंग पठानमाजरा यांचा नेहमीच वादांनी पाठलाग केला आहे. मंगळवारी मात्र त्यांच्या स्वतःच्या सरकारमधील पोलिसच त्यांचा पाठलाग करताना दिसून आले. एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार पठानमाजरा यांना सोमवारी अटक केली होती. मंगळवारी त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले. इतकंच नव्हे, तर पोलिसांनी पठानमाजरा यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या साथीदारांनी गोळीबार केला. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याचं वृत्त आहे.

अलीकडील काही दिवसांत आमदार पठानमाजरा यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर उघडपणे टीका सुरू केली होती. राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं होतं. आमदार पठानमाजरा यांना राजकीय कौटुंबिक वारसा लाभलेला आहे. त्यांच्या पूर्वजांनी १९२० मध्ये अकाली दलाच्या स्थापनेसाठी त्या काळात तब्बल १० हजार रुपयांचे योगदान दिले होते, तर त्यांचे वडील हरदेव सिंग हे काँग्रेसचे सरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत.

पठानमाजरा यांचा राजकीय प्रवास

हरमित सिंग पठाणमाजरा यांच्या कुटुंबाच्या मालकीची अनेक राज्यांमध्ये २५० ते ३०० एकर शेतजमीन असल्याचं सांगितलं जातं. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पठानमाजरा यांनी दोन कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. ५० वर्षीय पठानमाजरा यांनी आपली राजकीय कारकीर्द अकाली दलातून सुरू केली. १९९२ मध्ये ते बादल गटात युवा नेते म्हणून सहभागी झाले. मात्र, २०११ मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि बंडखोर नेते मनप्रीत बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीमध्ये सहभागी झाले. वर्षभरानंतर पुन्हा ते अकाली दलात परतले.

Maharashtra Politics : मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्पुरता सुटला, पण महायुतीतील मतभेद वाढले; कारण काय?

२०१५ मध्ये जिल्हा विकास पंचायत कार्यालयातील घटनेनंतर शिस्तभंगाच्या आरोपावरून पठानमाजरा यांची अकाली दलातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण तिकीट न मिळाल्याने पठानमाजरा यांनी २०१७ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. या निवडणुकीत त्यांना केवळ ११ हजार ८४० मते मिळाली आणि त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. या दरम्यान पंजाबमध्ये आम आदमी पार्टी उदयास येत होती.

२०२२ मध्ये पठानमाजरा पहिल्यांदाच आमदार

२०१८ मध्ये पठानमाजरा यांनी कार्यकर्ते सुखपाल सिंग खैरा यांच्यासह आपमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षाला यश न मिळाल्याने आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्याने त्यांनी पंजाब एकता पार्टीचा आसरा घेतला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पठानमाजरा पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले. मात्र, काँग्रेसला राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर मोठा पराभव पत्करावा लागल्याने त्यांनी पुन्हा ‘आप‘कडे मोर्चा वळवला. डिसेंबर २०२० मध्ये पठानमाजरा यांनी आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश केला. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची लाट आली.

या निवडणुकीत पठानमाजरा यांनीही मोठा विजय मिळवला. त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रेमसिंग चंदूमाजरा यांचा पुत्र हरिंदरपाल सिंग चंदूमाजरा यांचा तब्बल ४९,११२ मतांनी पराभव केला. मात्र, मे २०२४ मध्ये हरिंदरपाल यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पठानमाजरा यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी इतिहास लपवला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, सत्तेत आल्यानंतर आम आदमी पार्टीने पठानमाजरा यांची पंजाब विधानसभेच्या अनुमान समिती आणि शासन आश्वासन समितीवर नियुक्ती केली.

Harmeet Singh Pathanmajra arrest
पंजाबमधील आम आदमी पार्टीचे आमदार हरमीत सिंग पठानमाजरा (छायाचित्र दी इंडियन एक्स्प्रेस)

पठानमाजरा यांच्या दोन पत्नी आणि कौटुंबिक वाद

ऑगस्ट २०२२ मध्ये पठानमाजरा यांनी दोन लग्न केल्याचं स्वत:च मान्य केलं, ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले. मात्र, दुसरे लग्न हे पहिल्या पत्नीच्या संमतीनेच झाल्याचा दावा पठानमाजरा यांनी केला. काही दिवसांनंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने झिरकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पठानमाजरा यांनी आपले पहिले लग्न लपवले आणि घटस्फोट देण्याचे आश्वासन पाळले नाही, असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर पठानमाजरा यांनी आपले लैंगिक शोषण केले आणि जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप त्यांनी केला. या काळात आमदाराचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामागे चंदूमाजरा कुटुंबीयांचा कट असल्याचा आरोप पठानमाजरा यांनी केला.

हेही वाचा : मनोज जरांगेंची मागणी मान्य, आईचा उल्लेख येताच PM मोदी झाले भावुक; दिवसभरात काय घडलं?

पठानमाजरा यांच्यावर बलात्काराचा आरोप

अलीकडेच आमदार पठानमाजरा यांच्याविरुद्ध बलात्काराचा नवा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पठानमाजरा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना त्यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी आमदार पठानमाजरा यांनी पंजाबमधील पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असा आरोप करत थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारवर हल्ला चढवला होता. यानंतर त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याची कारवाईची गती वाढली असं सांगितलं जातं.

पठानमाजरा यांनी काय आरोप केले?

पठानमाजरा यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कृष्ण कुमार यांच्यावर सरकारची दिशाभूल केल्याचा आरोप केला. नद्यांमधील गाळ काढणे व बंधारे मजबूत करणे यांसारख्या पावसाळ्यापूर्वीच्या महत्त्वाच्या कामांना कृष्ण कुमार यांनीच अडथळा आणला असंही ते म्हणाले. मी हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला; पण कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पठानमाजरा यांनी केली. यावेळी त्यांनी दिल्लीतील आप नेतृत्वावरही टीका करत पंजाबमधील आमदारांना दडपले जात असल्याचा गंभीर आरोप केला. सध्या पठानमाजरा हे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.