सुप्रिया सुळे प्रतिनिधित्व करीत असलेल्या बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबरोबरच शेजारच्या शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादीचेच खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा निवडून येणार नाहीत, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने या दोन्ही मतदारसंघांत त्यांची राजकीय कसोटी लागणार आहे.

शिरुर मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे पुन्हा निवडून येणार नाहीत, असे अजित पवार यांनी जाहीर करून तसा निर्धारही व्यक्त केला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी पुरंदर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतरे पुन्हा निवडून येणार नाहीत, असे भाकित व्यक्त केले होते. त्यानुसार पुरंदर मतदारसंघातून शिवतरे यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे संजय जगताप निवडून आले होते. यामुळेच अजितदादांची भविष्यवाणी खरी ठरते, अशी चर्चा पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली.

हेही वाचा – महाशिबिरासाठी ठाकरे गटाकडून नाशिकचीच निवड का ?

अलीकडेच कर्जतमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात बोलताना अजित पवार यांनी, बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आपल्या गटाकडून लढविण्याचे जाहीर केले होत. बारामती मतदारसंघाच्या विद्यमान खासदार या सुप्रिया सुळे आहेत. बारामती जिंकण्याचा निर्धार भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही केला होता. यंदाही भाजपचे बारामतीवर लक्ष आहे. अजित पवार यांनी भाजपला साथ दिल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये धक्कादायक निकालाची भाजपच्या नेतृत्वाला अपेक्षा आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी सारी ताकद पणाला लावावी, अशी भाजपची योजना आहे. यासाठी पवार घराण्यातील कोणी उमेदवार रिंगणात असावा, असाही प्रयत्न आहे. यातूनच अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार वा पुत्र पार्थ पवार यांची उमेदवार म्हणून नावे चर्चेत आहेत.

शिरुर मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व शिवसेनेचे शिवाजीराव आढ‌ळराव पाटील यांनी केले होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या डॉ. कोल्हे यांनी आढ‌ळराव-पाटील यांचा पराभव केला होता. हा पराभव आढळ‌राव-पाटील यांना फारच जिव्हारी लागला आणि गेली साडेचार वर्षे ते आगामी निवडणुकीची तयारी करीत आहेत. शिवसेनेतील बंडानंतर आढ‌ळराव-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली.

हेही वाचा – गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी लोकसभा निवडणुकीत अशी खबरदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीतील बंडानंतर राजकीय संदर्भ बदलले. गेल्या वेळी राष्ट्रवादीने जिंकलेल्या चारही जागा लढविण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. यानुसार अजित पावर गटाने शिरुर मतदारसंघावर दावा केला आहे. दुसरीकडे माजी खासदार आढळराव – पाटील यांनीही मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. यामुळेच शिरुरची जागा अजित पवार गट किंवा शिवसेनेतील शिंदे गट लढविणार यावरून दोन्ही गटांमध्ये चढाओढ होण्याची चिन्हे आहेत.