लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महायुतीच्या जागा वाटपात शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भारतीय जनता पक्षाचा आग्रह कायम राहिल्याने या मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वडगावशेरीमध्ये भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) अशी तिरंगी लढतीची शक्यता आहे.

महायुतीच्या जागा वाटपात वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ कळीचा ठरला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत टिंगरे यांनी भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. मुळीक यावेळी वडगावशेरीमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुळीक नाराज असून वडगावशेरीवर भाजपने हक्क सांगावा, यासाठी मुळीक यांच्याकडून मुंबई वारी करण्यात आली होती.

आणखी वाचा-रायगड जिल्ह्यात महायुतीत बंडखोरी

मे महिन्यात झालेल्या अलिशान पोर्शे मोटार अपघात प्रकरणात टिंगरे यांचे नाव आल्यानंतर मुळीक यांच्या समर्थकांनी त्यावरून टिंगरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत टिंगरे यांना उमेदवारी नाकारली जाईल, अशी चर्चाही सुरू झाली होती. मात्र, टिंगरे यांची अजित पवार यांनी पाठराखण करतानाच टिंगरेच उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत दिले होते. वडगावशेरीमध्ये टिंगरे हेच महायुतीचे उमेदवार असतील, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर, सहजासहजी या मतदारसंघावरील दावा सोडायचा नाही, असा मुळीक यांचा निग्रह आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून एकमत न झाल्यास भाजप-राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा-वर्सोवामध्ये इच्छुकांची रीघ; काँग्रेसमधून २१ इच्छुक उमेदवारांचे अर्ज, ठाकरे गटही आग्रही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वडगावशेरीचे माजी आमदार बापू पठारे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याने आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वडगावशेरी मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मिळणार असल्याचे लक्षात घेऊन पठारे यांनी हा पक्ष प्रवेश केला होता. त्यामुळे पठारे हेच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे संभाव्य उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. मात्र, ते त्यांचा मुलगा सुरेंद्र यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पठारे कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी मिळणे निश्चित आहे. त्यामुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.