मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातांची मालिका सुरुच आहे. मंगळवारी किवळे एक्झिट येथे एसटी बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली असून या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बसचा टायर पंक्चर झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

एसटी महामंडळाची बस मंगळवारी सकाळी बोरिवलीहून सातारा येथे निघाली होती. किवळे एक्झिट येथे एसटी बसचा पुढचा टायर पंक्चर झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस सुमारे २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी होते. अपघातानंतर काही प्रवासी आपातकालिन खिडकीतून बाहेर पडले.  या अपघातात एकूण २५ प्रवासी जखमी झाले असून पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. आर्यन देवदूत आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वेगवान प्रवासासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे तयार करण्यात आला. मात्र अपघातांच्या मालिकेमुळे या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ एक्सप्रेस वे वरील अपघातांमुळे संतापल्या होत्या. बुधवारी रात्री मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करताना सिंधुताई सपकाळ यांच्यासमोर एका वाहनाचा अपघात होणार होता. मात्र हा अपघात थोडक्यात टळला. या गाडीमध्ये जवळपास वीस महिला आणि लहान मुले होती. ही घटना पाहून सिंधुताई सपकाळ संतापल्या. यानंतर गाडीतून उतरुन सिंधुताईंनी त्यांचा संताप आणि उद्विग्नता व्यक्त केली. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना सिंधुताईंनी खडे बोल सुनावले. मुंबई-पुणे एक्सप्रेस आणखी कितीजणांचे जीव घेणार ?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला होता.